Advertisement

जखमी मुलीवर सरकारी खर्चाने उपचार.

मुंबई:अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या घटनेचे पडसाद  विधानसभेत उमटले. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी या घटनेबद्दल स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. यावेळी बोलताना, मुलीवरील उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलेल, अशी घोषणा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली.

या घटनेत अकरा वर्षांच्या मुलीचा चेहरा गंभीररीत्या भाजला असून तिच्या डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पुढे प्लास्टिक सर्जरी करावी लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील मोठ्या रुग्णालयात तिचे उपचार करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी पटोले यांनी केली.राज्यात मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे .शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुली जर असुरक्षित असतील तर ती राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना अशी घटना घडणे हे गृह विभाग आणि सरकारचे अपयश आहे असे पटोले म्हणाले.आरोपीच्या शोधासाठी गावकऱ्यांची मदत घेतली जात आहे. मुलीवर सध्या प्रवरा मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या उपचारांचा १०० टक्के खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे विखे-पाटील यांनी यावेळी जाहीर केले.

Darpaan Jagat