मुंबई: मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. चित्रपट अभिनेत्री आणि पर्यावरणप्रेमी दिया मिर्झा यांनी दिवाळीत फटाके कमी फोडण्याबाबत केलेल्या आवाहनाचा व्हिडिओ पालिकेने सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, भाजपच्या आक्षेपानंतर पालिकेने हा व्हिडिओ हटवला असून, यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.
नेमका वाद काय?
मुंबईची बिघडलेली हवा आणि प्रदूषणाची स्थिती पाहता, महापालिकेने यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करणारी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत काही सेलिब्रिटींचे जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात आले होते. यामध्ये अभिनेत्री दिया मिर्झा यांनी नागरिकांना फटाके न फोडण्याचे आणि प्रदूषण कमी करण्याचे आवाहन केले होते.
यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी तीव्र आक्षेप घेतला. “दिवाळी साजरी कशी करावी, याचे धडे आम्हाला बाहेरच्या लोकांकडून नको आहेत. आमच्या परंपरा आणि संस्कृती आमच्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे,” असे ट्विट करत त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. साटम यांच्या या आक्षेपानंतर महापालिका प्रशासनाने काही तासांतच दिया मिर्झा यांचा हा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हटवला.
महापौर रितू तावडे यांची आक्रमक भूमिका
या संपूर्ण प्रकरणावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पत्रकार परिषद घेऊन कडाडून विरोध दर्शवला आहे.
-
“दिया मिर्झा या हिंदूविरोधी, देशद्रोही असून त्यांनी आम्हाला दिवाळी कशी साजरी करावी ते शिकवू नये,” अशा शब्दांत महापौरांनी त्यांचा आणि प्रशासनाचा समाचार घेतला.
-
दिया मिर्झा यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करणार असल्याचे सांगत, त्याविरोधात आपण महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना पत्र लिहून जाब विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-
दिया मिर्झा नेहमीच हिंदू सणांना लक्ष्य करतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेला विरोध करतात, असा आरोपही महापौरांनी केला. मात्र, हिंदुत्वाच्या विचारांशी आपली बांधिलकी कायम असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
विरोधक आणि नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
या वादावर महापालिकेतील इतरपक्षीय नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत:
-
अश्रफ आझमी (काँग्रेस गटनेते): दिया मिर्झा यांचा व्हिडिओ महापालिकेच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरून हटवणे अत्यंत दुर्दैवी आहे. व्हिडिओवरून वाद घालण्यापेक्षा प्रशासनाने मुंबईतील ढासळलेल्या पर्यावरणाबाबत उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
-
किशोरी पेडणेकर (शिवसेना नेत्या): “अमित साटम हे नेमके कोण आहेत? महापालिकेच्या कारभारात त्यांचा एवढा वावर का?” असा सवाल करत त्यांनी, “एका आमदाराला घाबरून जर महापालिकेने आपले ट्विट बंद केले, तर महापालिकेला टाळेच मारलेले बरे!” अशा शब्दांत प्रशासनाला धारेवर धरले.
-
अमेय घोले (शिवसेना गटनेते): दिया मिर्झा यांचा व्हिडिओ नेमक्या कोणत्या कारणांमुळे डिलीट झाला, याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले पाहिजे, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.
-
संजय घाडी (उपमहापौर): माधुरी दीक्षित, अजिंक्य रहाणे आणि दिया मिर्झा यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने दिवाळी आनंदाने साजरी करण्याचे आवाहन केले होते, यात काही गैर नाही. हा सण सर्वांचा असून चांगल्या गोष्टीसाठी आवाहन केले तर तेढ निर्माण करू नये. महापालिकेने डिलीट केलेला तो व्हिडिओ पुन्हा रिपोस्ट करायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या वादावर महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतेही सविस्तर अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही, परंतु आगामी काळात पर्यावरण संरक्षण विरुद्ध सांस्कृतिक परंपरा या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






