विशेष प्रतिनिधी, जळगाव: आज पुष्य नक्षत्राच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर स्नेहदर्पण सेवा फाउंडेशन आणि पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव येथील स्वातंत्र्य सैनिक जनार्दन सुका खडके (काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय) येथे भव्य सुवर्णप्राशन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रमाचा लाभ शाळेतील सुमारे ६०० विद्यार्थ्यांना देण्यात आला.
बालकांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, जळगाव यांचे अनमोल सहकार्य लाभले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक जनार्दन सुका खडके प्रार्थमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील पवार सर आणि काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत येवले सर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाप्रसंगी शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल सोगे, ॲडमिन डिपार्टमेंटच्या सौ. स्नेहा निंभोरे तसेच अंतरवासी विद्यार्थी प्रथमेश मूर्तंडक व रितीक परदेशी यांनी उपस्थित राहून अत्यंत शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना सुवर्णप्राशनचे डोस दिले. यावेळी तज्ज्ञांनी उपस्थित पालकांना पुष्य नक्षत्रावर दिल्या जाणाऱ्या सुवर्णप्राशनचे महत्त्व आणि मुलांच्या आरोग्यासाठी होणारे फायदे सविस्तरपणे पटवून दिले.
हा समाजोपयोगी उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहदर्पण सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष पवन खंबायत, उपाध्यक्ष अमोल पाटील आणि उपाध्यक्ष कल्पेश व्हिरोडकर यांच्यासह संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी व पालक शिक्षक संघाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि असा कौतुकास्पद सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या स्नेहदर्पण सेवा फाउंडेशन, पालक शिक्षक संघ आणि शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयाचे शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि उपस्थित पालकांनी मनापासून आभार मानले.













