जळगाव : जळगाव शहराच्या भवितव्याशी निगडित असलेल्या प्रारूप विकास योजना संदर्भात एकता संघटनेतर्फे आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या जुन्या हद्द व वाढीव हद्द प्रारूप विकास योजनेच्या प्रसिद्धी प्रक्रियेत झालेला कथित विलंब, अंतिम मुदतीच्या दिवशी रविवार असताना विशेष महासभा बोलावून ठराव क्रमांक १०७ मंजूर करण्याची घाई, तसेच या संपूर्ण प्रक्रियेची कायदेशीर वैधता तपासण्याची मागणी एकता संघटनेने आपल्या सविस्तर निवेदनातून केली आहे.
या निवेदनात दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या मूळ ठरावापासून ते २२ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या ठराव क्रमांक १०७ पर्यंतच्या संपूर्ण प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमातील कलम २६ अन्वये मुदतवाढ देण्यात आली होती काय, त्यासंबंधीचे आदेश, विशेष महासभेची नोटीस, उपस्थिती पत्रक, इतिवृत्त, मतदानाची नोंद आणि विकास योजनेची सर्व तांत्रिक कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मात्र, एवढ्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी गेलेल्या एकता संघटनेच्या शिष्टमंडळाला प्रथम आयुक्तांच्या कार्यालयातूनच निराशाजनक उत्तर मिळाले. आयुक्तांच्या पीएने स्पष्टपणे सांगितले की, आयुक्त साहेब जळगावकर नागरिकांच्या अडचणी ऐकण्यासाठी मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या तीनच दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत उपलब्ध असतात. त्यामुळे आपण आता अपर आयुक्तांना भेटावे.
त्यानुसार एकता संघटनेचे शिष्टमंडळ नियमानुसार भेटीची चिठ्ठी देऊन अपर आयुक्त श्रीमती शोभा बाविस्कर यांच्याकडे गेले. मात्र, त्यांनी प्रारूप विकास योजनेचे निवेदन हे नगररचना विभागाचे काम असल्याचे सांगत, ‘हे माझे काम नाही, मी फक्त एका विशिष्ट विभागाचेच काम पाहते, तुम्ही नगररचना विभागाकडे जाऊन निवेदन द्या,’ अशी भूमिका घेतली.
यावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना विनंती केली की, हा केवळ एखाद्या विभागाचा किरकोळ विषय नसून जळगाव शहरातील लाखो नागरिकांच्या भवितव्याशी, त्यांच्या मालमत्तेच्या हक्कांशी आणि शहराच्या नियोजनाशी संबंधित अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आम्हाला केवळ पाच मिनिटे द्या. आम्हाला कोणतेही छायाचित्र काढायचे नाही किंवा प्रसिद्धीसाठी फोटोसेशन करायचे नाही. आपण नागरिकांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून या विषयावर चर्चा घडवून आणावी, एवढीच आमची अपेक्षा आहे.
मात्र, अपर आयुक्तांनी आपली भूमिका बदलली नाही. ‘हे माझे काम नाही, तुम्ही नगररचना विभागाकडेच जा,’ असे सांगण्यात आले.
नागरिकांच्या करातून वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांना नागरिकांसाठी पाच मिनिटेही देता येत नाहीत का?
एकता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत विचारणा केली की, महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी हे जळगावकर नागरिकांनी भरलेल्या करातून वेतन घेतात. मग त्याच नागरिकांच्या शहराच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अधिकारी उपलब्ध का होत नाहीत? आयुक्तांची नागरिकांना भेटण्याची वेळ आठवड्यातील केवळ तीन दिवस, तेही दोन तासांचीच असेल आणि त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी आली तर नागरिकांनी आपल्या समस्या कोणाकडे मांडायच्या?
जळगाव शहराच्या विकासासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात नागरिकांना भेटण्यासाठी आणि त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नसेल, तर अशा प्रशासनाचा नागरिकांना काय उपयोग? असा संतप्त सवाल संघटनेने उपस्थित केला.
अखेर अधिकाऱ्यांच्या या टोलवाटोलवीला कंटाळून एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांनी स्वतः निवेदन टपाल विभागात जाऊन टपालाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्याचा निर्णय घेतला.
फारुख शेख यांचा प्रशासनाला सवाल :
नागरिकांनी फक्त कर भरायचा आणि प्रश्न विचारण्यासाठी मात्र अधिकाऱ्यांच्या दारात चकरा मारायच्या का?**
एकता संघटनेने स्पष्ट केले आहे की, आम्हाला कोणत्याही अधिकाऱ्याशी वैयक्तिक वाद घालायचा नाही. मात्र, जळगाव शहराच्या विकासाच्या नावाखाली नागरिकांचे कायदेशीर हक्क बाधित होत असतील, तर त्यावर प्रश्न विचारणे हे आमचे लोकशाही आणि नागरिक म्हणून कर्तव्य आहे.
प्रारूप विकास योजना ही केवळ कागदोपत्री प्रक्रिया नसून हजारो मालमत्ताधारक, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक आणि भविष्यातील जळगाव शहराच्या नियोजनाशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता असणे, नागरिकांना हरकती व सूचना मांडण्याची कायदेशीर संधी मिळणे आणि संपूर्ण कार्यवाहीची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
एकता संघटनेचा इशारा :
प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन मागितलेली कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, ठराव क्रमांक १०७ च्या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत नागरिकांच्या कायदेशीर हरकती व सूचना मांडण्याच्या अधिकारांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
अधिकाऱ्यांनी नागरिकांना भेटण्याच्या वेळेच्या चौकटीत अडकवून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये. प्रशासन हे नागरिकांसाठी आहे, नागरिक प्रशासनासाठी नाहीत, याचे भान प्रत्येक अधिकाऱ्याने ठेवले पाहिजे.






