Advertisement

मध्यवर्ती कचरा संकलन केंद्र व आधुनिक अग्निशमन दुचाकीचे लोकार्पण संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे आणि अग्निसुरक्षेच्या अधिक सक्षम सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मिळत असला, तरी तो केवळ त्यापुरता मर्यादित न ठेवता शासनाकडून अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे संयुक्त पाठपुरावा केला जाईल. जळगाव स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तसेच, शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येची गंभीर दखल घेत त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.०’ अंतर्गत जुन्या टी. बी. सॅनिटोरियम परिसरात उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती कचरा संकलन व हस्तांतरण केंद्राचे (ट्रान्सफर स्टेशन) आणि आधुनिक अग्निशमन दुचाकीचे लोकार्पण गुरुवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रسंगी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, महापौर दिपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, नगरसेवक व महापालिका अधिकारी उपस्थित होते.

मूलभूत सुविधांच्या कामांना गती द्या — पालकमंत्री

शहरातील स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. विमानतळ ते अजिंठा चौफुलीदरम्यान सौर पथदिव्यांसाठी जिल्हा नियोजन समितीतून पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगत ही कामे दर्जेदार व मुदतीत पूर्ण करून नियमित देखभाल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अंगणवाडी इमारतींसह नागरिकांच्या गरजेनुसार व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कामांना प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले. अरुंद गल्लीबोळांतील आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक अग्निशमन दुचाकी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कचरा संकलन केंद्राच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर प्रकल्पाच्या दर्जेदार उभारणीबद्दल महापालिका आयुक्त आदित्य जिवने (भा.प्र.से.) व त्यांच्या सहकार्यांच्या कामाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. उपस्थितांच्या आग्रहास्तव पालकमंत्र्यांनी आधुनिक अग्निशमन दुचाकी स्वतः चालवूनही पाहिली.

आधुनिक सुविधांमुळे कचरा व्यवस्थापनाला गती

या मध्यवर्ती केंद्रात शहरातील घंटागाड्यांद्वारे संकलित होणारा कचरा एकत्रित करून गार्बेज कॉम्पॅक्टरच्या साहाय्याने संकुचित करून पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जाणार आहे. येथे स्वतंत्र रॅम्प, गार्बेज कॉम्पॅक्टर, वजनकाटा, दूषित पाण्याच्या व्यवस्थापनाची सुविधा आणि सर्व ऋतूंमध्ये वापरता येणारे आच्छादित शेड उपलब्ध आहे. यामुळे घंटागाड्यांचा वेळ वाचून कचरा संकलन व वाहतूक अधिक जलद, शिस्तबद्ध आणि कार्यक्षम होणार असून, शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला नवी गती मिळणार आहे.

मान्यवरांचे मनोगत व सूचना

  • स्वच्छता व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल — महापौर दिपमाला काळे: स्वच्छ महाराष्ट्र अभियाнаंतर्गत उभारलेले हे केंद्र शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत मैलाचा दगड ठरेल. आधुनिक अग्निशमन दुचाकीमुळे अरुंद गल्लीबोळांमध्येही तातडीने मदत पोहोचवणे शक्य होईल, तसेच बंदिस्त व्यवस्थेमुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास टळेल.

  • शहराच्या विकासासाठी एकत्र काम करूया — आ. राजूमामा भोळे: जळगाव स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. पालकमंत्र्यांनी डीपीडीसीतून निधी उपलब्ध करून दिला असून प्रशासनाने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी. तसेच शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संयुक्त प्रयत्न करावेत.

  • रेल्वे स्थानक परिसर कचरामुक्त करा — खा. स्मिता वाघ: जळगाव रेल्वे स्थानक परिसरातील स्वच्छतेकडे लक्ष वेहत हा परिसर कचरामुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. बायपास परिसरातील अपघातांबाबत चिंता व्यक्त करत संबंधित यंत्रणांनी नियमित देखरेख व आवश्यक उपाययोजनांवर भर द्यावा.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार सोनवणे यांनी केले तर आभारप्रदर्शन उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे यांनी मानले. कार्यक्रमास नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Darpaan Jagat