जळगाव: खानदेशातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुणे आणि बिहारमधील सुपौल दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक/नियमित विशेष रेल्वे गाड्यांना जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. यामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांची आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, गाडी क्रमांक ११४०२ (पुणे ते सुपौल) आणि गाडी क्रमांक ११४०१ (सुपौल ते पुणे) या दोन्ही गाड्यांना जळगाव रेल्वे स्थानकावर त्वरित थांबा देण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
रावेर आणि भुसावळला थांबा, मग जळगावला का नाही?
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे प्रशासनाने या गाड्यांना जळगाव जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या रावेर आणि भुसावळ या स्थानकांवर थांबा दिला आहे. परंतु, जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आणि मध्यवर्ती व्यापार केंद्र असलेल्या जळगाव रेल्वे स्थानकावरच या गाडीला अधिकृत थांबा दिलेला नाही. या विसंगतीमुळे जळगावकरांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
प्रवाशांची होणारी मोठी गैरसोय
जळगाव जिल्ह्यातून पुणे तसेच उत्तर बिहारच्या दिशेने (सुपौल, दरभंगा परिसर) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये नोकरदार वर्ग, व्यावसायिक, कामगार आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जळगाव स्थानकावर थांबा नसल्यामुळे जळगावकरांना ही गाडी पकडण्यासाठी किंवा उतरण्यासाठी नाहक भुसावळ किंवा रावेर गाठावे लागते. यामुळे प्रवाशांचा अतिरीक्त वेळ आणि पैसा खर्च होत असून त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी
जळगाव हे खान्देशातील एक महत्त्वाचे व्यापारी व शैक्षणिक हब असल्याने येथे रेल्वे प्रवाशांची कायम गर्दी असते. प्रवाशांची ही वाढती गरज आणि होणारी हेळसांड लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. गाडी क्र. ११४०२ (पुणे-सुपौल) आणि गाडी क्र. ११४०१ (सुपौल-पुणे) या दोन्ही गाड्यांना जळगाव स्थानकावर तात्काळ थांबा मंजूर करण्यात यावा, अशी आग्रही मागणी जळगावमधील नागरिक व प्रवासी वर्गाकडून होत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही काहींनी दिला आहे.







