Advertisement

चोपडा शहर स्वच्छता अपडेट: रामपुरा प्रकल्पातील जुन्या कचऱ्यामुळे लागली होती आग, प्रशासनाकडून वस्तुस्थिती जाहीर

चोपडा (प्रतिनिधी):

चोपडा शहरात घनकचरा व्यवस्थापन, दैनंदिन कचरा संकलन, गटार सफाई आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कामकाज नियमितपणे सुरू असून, प्रशासनाकडून स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, रामपुरा येथील घनकचरा प्रकल्पात २५ ऑक्टोबर २०२६ रोजी लागलेल्या आगीच्या घटना आणि नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने चोपडा नगरपरिषद प्रशासनाने आपली वस्तुस्थिती अधिकृतपणे स्पष्ट केली आहे.

जुन्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे लागली होती आग

रामपुरा येथील गट नं. ४०६ मधील घनकचरा प्रकल्पाचे कामकाज मक्तेदारामार्फत चालवले जात असून, त्यांना कंपोस्ट खत प्रकल्प चालवण्याचा कार्यादेश देण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पात ओल्या कचऱ्यावर विंड्रो कंपोस्टिंग पद्धतीने आणि सुक्या कचऱ्याचे एमआरएफ (MRF) युनिटद्वारे वर्गीकरण केले जात आहे.

प्रकल्पात दिसून येणारे कचऱ्याचे मोठे ढिगारे हे मागील ७ ते ८ वर्षांपासून साचलेले जुने ढिगारे आहेत. संबंधित मक्तेदाराला येऊन केवळ चार महिने झाले असल्यामुळे, हे जुने ढिगारे सध्याच्या कामकाजातील निष्काळजीपणामुळे निर्माण झाल्याचा आरोप वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. २५ ऑक्टोबर रोजी या जुन्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये अंतर्गत उष्णता आणि मिथेनसारख्या ज्वलनशील वायूंच्या निर्मितीमुळे आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्वच्छता व विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन आग आटोक्यात आणली, ज्यामुळे मोठी जीवित व वित्तहानी टळली. प्रशासनाने कोणतीही माहिती लपवलेली नसून, गटारीतील गाळ व मिश्र कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मक्तेदाराला सख्त निर्देश देण्यात आले आहेत.

दारोदोरी कचरा संकलन आणि स्वच्छता नियमित

शहरातील १५ प्रभागांसाठी मक्तेदारामार्फत १६ घंटागाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, नागरिकांच्या घरांमधून दैनंदिन कचरा संकलित केला जात आहे. व्यापारी प्रतिष्ठानांमधून दिवसातून दोन वेळा, तर चिकन वेस्ट व फिश मार्केटच्या कचऱ्यासाठी स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वच्छता विभागामार्फत रस्ते सफाई, गटार सफाई आणि नागरिकांच्या तक्रारींचे २४ तासांच्या आत निराकरण करण्यावर प्रशासनाचा विशेष भर असतो.

मुख्‍यधिकाऱ्यांचा सज्जड दम

“घनकचरा व्यवस्थापनाच्या कामकाजात संबंधित मक्तेदारकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. कचरा संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया आणि परिसर स्वच्छतेचे नियोजन योग्य पद्धतीने पार पाडणे आवश्यक आहे. नागरिकांना स्वच्छतेसंदर्भात तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी,” अशा स्पष्ट शब्दांत मा. मुख्याधिकारी श्री. विवेक धांडे यांनी सज्जड दम दिला आहे.

शहरात स्वच्छता प्रभावीपणे राखण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असून, नागरिकांनीही ओला व सुका कचरा वेगवेगळा देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन स्वच्छता विभाग प्रमुख वसंत राठोड यांनी केले आहे.

Darpaan Jagat