जळगाव,चोपडा: जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी धडक कारवाई करत ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून कार आणि बाईकसह एकूण ₹६,०८,९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हातेड शिवारात रात्रीची धडक कारवाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११:५३ वाजता लासूर ते हातेड जाणाऱ्या रस्त्यावरील पाटचारीजवळ, हातेड शिवारात नाकाबंदी व वाहनांची तपासणी सुरू होती. या तपासणीदरम्यान एका कारची झडती घेतली असता, त्यात ७ किलो ११६ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कारमधील आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी: १. विष्णू सुभाष सुळे (वय ३७, रा. पिंप्री, जि. पुणे) २. प्रकाश बबन शिंदे (वय ३०, रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) ३. प्रशांत ताराचंद अथाणी (वय २९, रा. टाकळीमिया, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण ₹६,०८,९००):
-
गांजा: ७ किलो ११६ ग्रॅम (किंमत ₹१,७७,९००)
-
वाहने: १ हुंडाई सॅन्ट्रो कार (₹३,००,०००) व १ पल्सर मोटारसायकल (₹९०,०००)
-
इतर: ५ विविध कंपन्यांचे मोबाईल फोन (₹४१,०००)
NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४६/२०२६ अन्वये अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act, 1985) मधील कलम २०(ब) व २२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तस्करीचे मूळ शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत












