जळगाव : किनगाव, ता. यावल येथे दिनांक २६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक ठिकाणी जमावासह फेरफटका, घोषणाबाजी व पोलिस अधिकाऱ्यांशी केलेल्या वक्तव्यांची तसेच धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असलेल्या कथित वक्तव्यांची निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन आज जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देण्यात आले.
श्रीराम पाटील व राजू भाई मोरे यांच्या नेतृत्वाखाली एकता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी हे निवेदन सादर केले.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, कलम ३७ अंतर्गत आदेश सामान्य नागरिकांना लागू होत असतील, तर तोच कायदा राजकीयदृष्ट्या प्रभावशाली किंवा माजी लोकप्रतिनिधींनाही समानपणे लागू झाला पाहिजे. कायदा व्यक्तीच्या पद, राजकीय प्रभाव किंवा सामाजिक प्रतिष्ठेनुसार बदलता कामा नये.
दिनांक २६ ऑक्टोबरच्या घटनेचे संपूर्ण व्हिडिओ फुटेज, सी सी टी व्ही, पोलिस बंदोबस्ताचे आदेश, स्टेशन डायरी तसेच दिनांक २४ ऑक्टोबरच्या घटनेशी संबंधित एफ आय आर व अन्य पुरावे तातडीने जतन करून तपासण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली.
कलम ३७ अंतर्गत वैध आदेशाचा भंग झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १३५ अंतर्गत, तसेच धार्मिक समुदायांमध्ये वैमनस्य निर्माण करणारी वक्तव्ये सिद्ध झाल्यास बी एन एस कलम १९६ व इतर लागू तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली.
“ही तक्रार कोणत्याही धर्माच्या बाजूने किंवा विरोधात नसून कायद्याच्या समान अंमलबजावणीसाठी आहे. सामान्य नागरिकांसाठी एक कायदा आणि प्रभावशाली व्यक्तींसाठी दुसरा कायदा, अशी परिस्थिती संविधान मान्य करत नाही.” असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला.
“कायदा सर्वांसाठी समान आहे का?” या एकाच प्रश्नाचे प्रशासनाने तथ्याधारित आणि कायदेशीर उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
राजू भाई मोरे,शिवराम पाटील, सुभाष पवार,कुर्बान मेंबर, (फैजपूर) फारुक शेख, रहीम पटेल, मतीन पटेल, आरिफ देशमुख मजहर पठाण, अन्वर शिकलगर, अनिस शहा, डॉक्टर शाकीर, वसीम सर, मेहमूद रंगरेज, साहिल शेख, अमीन शेख, गुफरान शेख, नजमुद्दीन शेख, मोहसीन खान, शेख साबीर, उबेद खान, आदींची उपस्थिती होती.







