Advertisement

भारतीय मुस्लिमांनी अमेरिकेत भारतीय संस्कार, संस्कृती आणि समाजसेवेची परंपरा जपून भारताचे नाव उज्ज्वल करावे

फ्रेमाँट (कॅलिफोर्निया, अमेरिका) : (प्रतिनिधी)अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील फ्रेमाँट व परिसरात वास्तव्यास असलेल्या सुमारे ७५ भारतीय मुस्लिम कुटुंबांच्या वतीने यंदा पवित्र हज यात्रा पूर्ण करून परतलेल्या हज यात्रेकरूंच्या सत्कारार्थ विशेष स्नेहमेळावा व दावत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित कुटुंबांमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू (चेन्नई), कर्नाटक (बेंगळुरू), उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, मध्य प्रदेश तसेच भारतातील विविध राज्यांतील भारतीय मुस्लिम कुटुंबांचा सहभाग होता.
विविध भाषिक पार्श्वभूमी असूनही सर्वांना समजावे म्हणून कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शन राष्ट्रभाषा हिंदी माध्यमातून करण्यात आले. त्यामुळे उपस्थित सर्व कुटुंबीयांनी भाषण अत्यंत लक्षपूर्वक ऐकून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी महाराष्ट्रातील जळगाव येथील  सामाजिक कार्यकर्ते व एकता संघटनेचे संस्थापक समन्वयक फारुख शेख यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या प्रभावी व हृदयस्पर्शी भाषणातून हजचे आध्यात्मिक महत्त्व, इस्लामचे मानवी मूल्य, भारतीय संस्कार आणि परदेशात राहणाऱ्या भारतीय मुस्लिमांची सामाजिक जबाबदारी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
फारुख शेख म्हणाले की, हज ही केवळ धार्मिक यात्रा नसून जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी महान इबादत आहे. हज करून परतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात नमाजाची नियमितता, प्रामाणिकपणा, हलाल उपजीविका, उत्तम चारित्र्य, मानवसेवा, विनम्रता आणि समाजाप्रती जबाबदारी या मूल्यांचे प्रतिबिंब दिसले पाहिजे.
यावेळी त्यांनी अमेरिकेतील भारतीय मुस्लिमांना भावनिक आवाहन करताना सांगितले,
“आपण अमेरिकेत राहत असलो तरी आपल्या प्रत्येक कृतीतून भारताचे प्रतिनिधित्व करत असतो. म्हणून भारतीय संस्कार, भारतीय संस्कृती, कुटुंबव्यवस्था, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची मूल्ये जपणे हे प्रत्येक भारतीय मुस्लिमाचे कर्तव्य आहे. अमेरिकेत आदर्श मुस्लिम आणि आदर्श भारतीय म्हणून जगा. आपल्या चारित्र्याने, प्रामाणिक वर्तनाने, समाजसेवेने आणि बंधुभावाने भारताचे नाव संपूर्ण जगात उज्ज्वल करा.”
त्यांनी पुढे भारतीय मुस्लिमांनी संस्कार, संस्कृती आणि समाजसेवेची परंपरा जपावी, स्थानिक समाजात सकारात्मक योगदान द्यावे आणि आपल्या मुलांना धार्मिक शिक्षणाबरोबर आधुनिक शिक्षण, नैतिक मूल्ये, संविधानिक जाणीव, देशप्रेम आणि मानवतेची शिकवण द्यावी, असेही आवाहन केले.
फारुख शेख यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाला सर्व राज्यांतील उपस्थित कुटुंबीयांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. विविध राज्यांतून आलेल्या भारतीय मुस्लिमांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा ठरला, अशी भावना अनेक उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाची सांगता हज यात्रेकरूंचा हज अल्लाहकडून कबूल व्हावा, भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांत शांतता, बंधुता, मानवता व परस्पर सलोखा वृद्धिंगत व्हावा तसेच सर्वांना पुन्हा पुन्हा पवित्र हज यात्रेची संधी लाभावी, या सामूहिक दुआने करण्यात आली.
Darpaan Jagat