Advertisement

सुलेमान खान प्रकरणात दोन आरोपींना न्यायालयाचा दणका!

जळगाव : जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील सुलेमान खान रहीम खान हत्या प्रकरणात जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी क्रमांक सात कृष्णा राजू तेलीचा जामीन अर्ज आणि आरोपी क्रमांक तीन घनश्याम उर्फ सुरत बिहारीलाल शर्माचा डिस्चार्ज अर्ज फेटाळला.
शर्माच्या डिस्चार्ज अर्जाला फिर्यादी व एकता संघटनेच्या वतीने अॅड. शरीफ पटेल यांनी 32 मुद्द्यांच्या आधारे विरोध केला. तर कृष्णा तेलीच्या जामीन अर्जावरही सरकारी पक्षासह अॅड. शरीफ पटेल यांनी युक्तिवाद केला. उपलब्ध कागदोपत्री पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने दोन्ही अर्ज नामंजूर केले.
या प्रकरणात एकूण 11 आरोपी निष्पन्न झाले असून 10 आरोपींवर कारवाई झाली आहे; मात्र घनश्याम उर्फ शिवाजी अशोक माळी अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येते.
“फरार आरोपी जामनेरमध्येच असल्याची माहिती असूनही अटक का होत नाही?” असा सवाल एकता संघटनेचे फारुक शेख यांनी उपस्थित केला आहे. माळी याला तातडीने अटक करून न्यायालयासमोर हजर करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
सुलेमान खान यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार, असा निर्धार एकता संघटनेने व्यक्त केला आहे.
Darpaan Jagat