Advertisement

आदिवासी आंदोलनाला एकता संघटनेची मानवतेची साथ

जळगाव : जमीन हक्क, वनहक्क, रेशन कार्ड, आधार कार्ड आदी मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू आहे. हजारो आंदोलक उन्हात ठिय्या देऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करीत आहेत.
या संघर्षाची मानवतावादी दखल घेत जळगाव जिल्हा एकता संघटनेने सुमारे २ हजार आदिवासी बांधव-भगिनींसाठी गुरुवारी भोजनाची व्यवस्था करून त्यांच्या संघर्षाला माणुसकीची साथ दिली.शुक्रवार रोजी सुद्धा पुरी भाजी देण्यात येणार असल्याचे फारुक शेख यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांच्या मूलभूत गरजांची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
यावेळी एकता संघटनेचे फारुक शेख यांनी “आंदोलकांना भोजन देण्यासाठी संघटना पुढे येते, मग त्यांच्या न्याय्य मागण्या ऐकण्यासाठी जळगावातील चार मंत्र्यांपैकी एकही मंत्री आंदोलनस्थळी का येत नाही?” असा सवाल केला.
“ही कोणत्याही व्यक्तीविरोधातील भूमिका नाही. आदिवासी बांधवांच्या न्याय्य व संविधानिक हक्कांच्या संघर्षाला मानवतेच्या नात्याने साथ देणे, ही एकता संघटनेची भूमिका आहे,” असे फारुक शेख यांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलकांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन संबंधित मंत्र्यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी संवाद साधावा, अशी मागणी एकता संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली.
शिष्टमंडळात हाफिज रहीम पटेल, मौलाना कासीम, मौलाना शफीक पटेल, मौलाना इम्रान काकर, मौलाना गुफरान, अनवर सिकलगर, मतीन पटेल, आरिफ देशमुख आदी उपस्थित होते.
Darpaan Jagat