जळगाव (विशेष प्रतिनिधी):
जळगाव शहरातील योगेश्वर नगर परिसरातील प्रसिद्ध नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणाचा शनी पेठ पोलिसांनी अवघ्या काही वेळात छडा लावला आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपीला मुसक्या आवळल्या असून, त्याच्याकडून १२ हजार ५५० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
अशी झाली कारवाई
नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्यानंतर शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले.
तपासादरम्यान CCTV फुटेजचे सखोल विश्लेषण आणि तांत्रिक मदतीच्या आधारे संशयिताची माहिती मिळवण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून चंद्रकांत पाटील (वय वर्ष…, रा. दशरथ नगर, जळगाव) यास अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या ताब्यातून चोरीची १२ हजार ५५० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलाचाही सहभाग
या चोरीच्या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास हे.कॉ. अनिल साळुंखे करत आहेत.
तपास पथक
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे, पोलीस अंमलदार विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, पराग दुसाने, अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे, योगेश साबळे, नवजित चौधरी तसेच CCTV फुटेज विश्लेषक मुबारक देशमुख यांच्या पथकाने केली.














