जळगाव (विशेष प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव पोलिसांनी भल्या पहाटेपासून ‘ऑपरेशन ३/२५’ ही विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
१० वर्षांतील गुन्हेगारांची झाडाझडती
जिल्ह्यात गेल्या १० वर्षांच्या कालावधीत भारतीय शस्त्र अधिनियमान्वये (Arms Act) गुन्हे दाखल असलेल्या, बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर करणाऱ्या तसेच गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची गोपनीय माहिती संकलित करण्यात आली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकांनी संबंधित २४ अट्टल गुन्हेगारांच्या निवासाची, त्यांच्याकडील संशयित वाहनांची आणि शस्त्रास्त्रांची अचानक पडताळणी व झाडाझडती घेतली.
७ आरोपी अटकेत; गावठी कट्टे, काडतुसे आणि वाहने जप्त
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील भुसावळ बाजारपेठ, वरणगाव, एमआयडीसी (जळगाव), स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत एकूण ७ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
जप्त करण्यात आलेला ऐवज:
-
गावठी कट्टे: ७
-
जिवंत काडतुसे (राऊंड): ११
-
धारदार शस्त्रे: १ चाकू, १ तलवार
-
इलेक्ट्रॉनिक्स व वाहने: २५ मोबाईल फोन, ३ मोटारसायकल
-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹७,१९,६०० (सात लाख १९ हजार ६०० रुपये)
“संभाव्य गंभीर गुन्हे घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे आमचे प्राधान्य आहे. आगामी काळातही गुन्हेगारांविरुद्ध अशाच प्रकारची प्रभावी व कठोर कारवाई सुरूच राहील.”
— डॉ. श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक, जळगाव)














