Advertisement

आई-वडिलांचे छत्र हरपले! पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही संपवले जीवन; दोन चिमुकल्या मुली पोरक्या

पिंपरी-चिंचवड: मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेत पती नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या महिनाभरातच त्यांच्या २३ वर्षीय पत्नी सोनाली गायकवाड यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्या दोन लहान चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या आहेत. दरम्यान, सोनाली यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक त्रास आणि महापालिकेकडून मिळालेल्या आर्थिक मदतीच्या वाटपाचा वाद कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

आर्थिक मदतीवरून मानसिक त्रासाचा आरोप

नागेश गायकवाड यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून आर्थिक मदत मिळाली होती. नातेवाईकांच्या दाव्यानुसार, या मदतीतील ६० टक्के रक्कम नागेश यांच्या आईला, तर ४० टक्के रक्कम पत्नी सोनाली यांना देण्यात आली होती. याच आर्थिक मदतीच्या वाटपावरून सासरच्या मंडळींकडून सोनाली यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच नागेश यांच्या मृत्यूला सोनाली यांनाच जबाबदार धरून त्रास दिला जात असल्याचा दावाही त्यांच्या भावाने केला आहे.

मृत्यूच्या वेळेबाबत नातेवाईकांकडून संशय व्यक्त

सोनाली यांच्या मृत्यूची माहिती माहेरच्या कुटुंबीयांना उशिरा देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. सोनाली यांचा मृत्यू दुपारी झाला असावा; मात्र याची माहिती संध्याकाळी सातच्या सुमारास देण्यात आली, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सोनाली यांचे आई-वडील घराजवळच राहत असतानाही त्यांना तातडीने कल्पना का देण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आई-वडिलांना केला होता शेवटचा फोन

घटनेपूर्वी सोनाली यांनी आपल्या आई-वडिलांना फोन करून मोशी येथे येण्यास सांगितले होते, असा दावा माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सोनाली यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी माहेरच्या मंडळींनी केली आहे.

पोलीस तपास सुरू:

या प्रकरणातील कौटुंबिक आरोप, आर्थिक मदतीचे वाटप आणि सोनाली यांच्या मृत्यूची परिस्थिती याबाबत भोसरी एमआईडीसी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. तपासाअंतीच या घटनेमागील नेमकी वस्तुस्थिती समोर येईल. आई-वडिलांच्या अकाली जाण्याने दोन लहान मुलींवर ओढवलेल्या या प्रसंगाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Darpaan Jagat