Advertisement

३.७२ कोटींची बनावट मनपा परवानगी फसवणूक: संशयित सोशल मीडियावर देतायेत पोलिसांना खुले आव्हान; पीडित उद्योजक मुख्यमंत्र्यांच्या दरबारात!

जळगाव: जळगाव शहरातील एका मोक्याच्या व्यापारी संकुलात महापालिकेची बनावट बांधकाम परवानगी दाखवून तब्बल ३ कोटी ७२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असला, तरी गुन्ह्यातील मुख्य संशयित जळगावसह देशभरात मोकाट फिरत असून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून पोलिसांना खुले आव्हान देत आहेत. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेमके प्रकरण काय?

जळगाव जिल्ह्यातील व्यावसायिक तथा हॉटेल व इस्टेट ब्रोकर सुरेश नंदलाल तलरेजा (रा. श्रावेल अपार्टमेंट, गणपतीनगर) यांना शहरातील सिटी सर्व्हे क्र. २१२५/७ मधील संत बाबा हरदासराम शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने व ऑफिसच्या विक्रीची जाहिरात पाहायला मिळाली. त्यांनी तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाबाबत चौकशी केली असता, सुरुवातीला मनपाची परवानगी नसल्याने हा व्यवहार नाकारला होता.

मात्र, संशयित आरोपींनी मनपाच्या नगररचना अधिकाऱ्यांची सही व शिक्का असलेले तिसऱ्या मजल्याच्या वैध बांधकाम परवानगीचे बनावट पत्र दाखवून तलरेजा यांचा विश्वास संपादन केला. यानंतर तलरेजा यांनी विविध व्यवहारांतून आरोपींना ३ कोटी ७२ लाख रुपये अदा केले. जागेचा ताबा मिळाल्यानंतर सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून कार्यालय व रीडिंग रूम सुरू करण्यात आली. मात्र, जेव्हा मनपाकडे अधिकृत चौकशी करण्यात आली, तेव्हा तिसऱ्या मजल्याला कोणतीही परवानगीच नसल्याचे उघड झाले. सर्वात धक्कादायक म्हणजे, तलरेजा यांच्या ताब्यातील जागा कागदपत्रांमध्ये ‘ओपन टेरेस’ दाखवून मुंबईतील एका कंपनीच्या नावावर परस्पर विकण्यात आल्याचे समोर आले.

गुन्ह्यात ५ जणांसह कंपन्यांवर गुन्हा दाखल

पीडित सुरेश तलरेजा यांच्या फिर्यादीवरून खालील व्यक्ती आणि कंपन्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे:

  • के. पी. इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रोप्रायटर ममता अनिल साहित्या

  • अनिल खुबचंद साहित्या

  • खुबचंद प्रेमचंद साहित्या

  • नितीन खुबचंद साहित्या (सर्व रा. खुबचंद साहित्या टॉवर, मोहाडी रोड, जळगाव)

  • जयराम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स प्रा. लि. (ग्रँट रोड, मुंबई)

  • विशाल रामगोपाल शर्मा (संचालक, जयराम इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबई)

संशयितांचे सोशल मीडियावरून पोलिसांना खुले आव्हान

शहर पोलिस ठाण्यात ६ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल होऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, संशयित खुबचंद साहित्या हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत ऑनलाईन सक्रिय राहत व्हिडिओ तयार करत आहे. मुंबई, दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेशसह देशभरातील विविध शहरांत फिरून तो व्हिडिओ बनवत असून, जळगावात येण्याबाबतही त्याने व्हिडिओ शेअर केला होता. विशेष म्हणजे, तो उघडपणे जिल्ह्यातील नेते आणि पोलिसांवर टीका करत असतानाही पोलिसांना तो गवसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलिसांवर संशयाची सुई; पीडित जाणार मुख्यमंत्र्यांकडे

“सर्व माहिती असून आणि संशयित पोलिसांना खुले आव्हान देत असतानाही त्याला अटक केली जात नाही. यामुळे पोलिसांवर कुणाचा तरी दबाव असावा किंवा तपास यंत्रणेचे साहित्यासोबत काहीतरी साटेलोटे असावे, असा संशय येतो,” अशी प्रतिक्रिया पीडित सुरेश तलरेजा यांनी दिली आहे. करोडो रुपयांची फसवणूक होऊनही न्याय मिळत नसल्याने हतबल झालेले तलरेजा आता पुढील आठवड्यात दिवाळीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.

Darpaan Jagat