जळगाव : वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा क्रमांक 0267/2026 मधील गंभीर हल्ल्यात जखमी सरफराज सैयद चा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला मॉब लिंचिंग व पूर्वनियोजित सूडभावनेच्या अंगाने तपासण्यात यावे, तसेच उर्वरित आरोपींना तातडीने अटक करून स्वतंत्र विशेष तपास पथक (एस आय टी) स्थापन करावे, या मागणीसाठी मुस्लिम समाजाचे शिष्ट मंडळ करीम सालार, मुफ्ती हारून नदवी एकता संघटनचे समन्वयक फारुक शेख, ए पी सी आर चे आरिफ देशमुख, सिकलगर बिरादरीचे अन्वर खान,हुफ्फाझ फाउंडेशन चे मौलाना गुफरान , समाजवादी चे रिझवान शेख व साहिल शेख यांनी ११ नोव्हेंबर रोजी पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनाची गंभीर दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून शिष्ट मंडळ त्यांच्या कडे पाठविले व प्रकरणाची चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर शिष्टमंडळा ने पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व स्वतंत्र एस आय टी स्थापन करण्याची लेखी मागणी केली.
निवेदनातील मुख्य मागण्या
या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या *तहसीन एस. पूनावाला विरुद्ध भारत सरकार (17 जुलै 2018)* या ऐतिहासिक निकालाचा संदर्भ देण्यात आला असून, जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील बेटावद येथील सुलेमान खान मॉब लिंचिंग प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एस आय टी चा दाखलाही देण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये आठ आरोपींची नोंद, अटकेबाबत पोलीस अधीक्षकांची महत्त्वपूर्ण माहिती!
चर्चेदरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी एफआयआरमध्ये आठ आरोपी अज्ञात म्हणून नमूद असल्याची बाब मान्य केली. तसेच ९ नोव्हेंबरपर्यंत केवळ दोन आरोपींना अटक झाली होती. मात्र, मुस्लिम शिष्टमंडळाने ९ नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केल्यानंतर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आतापर्यंत एकूण चार आरोपी अटकेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
एस आय टी स्थापन करण्याच्या मागणीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
सदर गुन्ह्याचा तपास मुक्ताईनगरचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे ठोस आश्वासनही त्यांनी दिले.
एकता संघटनेची ठाम भूमिका :
दीड वर्षांपूर्वी खामखेडा येथे घडलेल्या घटनेचा बदला घेण्याच्या पूर्वग्रहदूषित भावनेतून सदर हल्ला झाल्याचा गंभीर संशय आहे. त्यामुळे उर्वरित आरोपींची तातडीने अटक, निष्पक्ष तपास आणि स्वतंत्र एस आय टी ही आमची प्रमुख मागणी आहे. बेटावद येथील सुलेमान खान प्रकरणानंतरही अशा घटनांची पुनरावृत्ती होणे ही चिंतेची बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे.
आता पाचआरोपी अटकेत असले तरी उर्वरित आरोपी मोकाट राहणे हा पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आहे. आरोपींना अटक, निष्पक्ष तपास आणि एस आय टी स्थापन होईपर्यंत आमचा कायदेशीर लढा सुरूच राहील असा इशारा फारुक शेख यांनी दिला.






