जळगाव (प्रतिनिधी): कला, साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाचे एक सशक्त माध्यम असलेल्या मराठी रंगभूमीचा गौरव वाढवणारा ‘मराठी रंगभूमी दिन’ जळगावात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या रंगतदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समस्त रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मराठी रंगभूमीला एक समृद्ध वारसा लाभलेला असून, ती म्हणजे प्रतिभा, सर्जनशीलता आणि सामाजिक बदल यांचा एक अनमोल ठेवा आहे. याच परंपरेनुसार, शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नटराज व रंगमंच पूजन करण्यात आले.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्याला जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, आमदार राजुमामा भोळे, नगरसेवक विष्णू भंगाळे, हर्षल मावळे यांच्यासह शहरातील समस्त रंगकर्मी व कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे यांनी प्रास्ताविक केले.
बाळगंधर्व नाट्यगृह नूतनीकरणाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा:
कार्यक्रमादरम्यान आ. राजुमामा भोळे यांनी शहरातील रस्त्यांच्या प्रश्नासोबतच नाट्यगृहासाठी कलावंतांची होणारी वणवण आणि सर्वसामान्यांना संभाजीराजे नाट्यगृहाचा खर्च परवडत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यासाठी बालगंधर्व खुले नाट्यगृह लवकरात लवकर दुरुस्त करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी हा प्रश्न तातडीने सोडवण्याची विनंती पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
यावर सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी, “आपला पुढचा रंगभूमी दिन हा नव्याने दुरुस्त झालेल्या बालगंधर्व खुले नाट्यगृहातच होईल,” असे ठोस आश्वासन दिले. तसेच महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांनीही सर्व रंगकर्मींना रंगभूमी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम:
-
नाट्य सादरीकरण: अमोल ठाकूर लिखित व दिग्दर्शित ‘गाईड’ ही एकांकिका रंगभूमी दिनानिमित्त सादर करण्यात आली.
-
पद्य व नांदी: शरद पांडे यांनी पद्य सादर केले, तर ‘पंचतुंड नरुंड मालधर’ ही नांदी दुष्यंत जोशी, यश देशपांडे, खुषी बामूल ,प्रणाली बाविस्कर यांनी सादर केली.
-
सांगीत व सजावट: तबल्यावर दर्शन गुजराती यांनी साथसंगत केली, तर रंगोली सजावटीसाठी कुमुद नारखेडे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास चिंतामण पाटील, दुष्यंत जोशी, पियुष रावळ, दीपक चांदोरकर, दीपक भट, रमेश भोळे, पवन खंबायत,प्रदीप भोई, महेंद्र खेडकर, चंद्रकांत पाटील, नितीन राजपूत, ओमप्रकाश शर्मा,रूपाली वाघ ,अरविंद देशपांडे, अनिल मोरे, गौरव लवंगले, आकाश बाविस्कर, जगदीश नेवे, सुभाष मराठे, विजय पाठक, संजय निकुंभ, राजेंद्र देशमुख,हनुमान सुरवसे, सुदर्शन पाटील, सचिन महाजन ,शरद भालेराव, अशोक जोशी, राजेश पाटील, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वाघुडे आणि राजेंद्र देशमुख यांनी केले.







