जळगाव – १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रांगणात महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते विधीवत गुढीपूजन करून गुढी उभारण्यात आली. पारंपरिक पद्धतीने सण साजरा करत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, सभागृह नेते नितीन लढ्ढा, भाजप गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रफुल्ल देवकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून आयोजित उपक्रमामुळे मनपा परिसरात धार्मिक, सांस्कृतिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
गुढी उभारल्यानंतर महापौरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांची विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून सर्व ठिकाणी माल्यार्पण करून वंदन करण्यात आले.
गुढीपाडवा आणि महानगरपालिका स्थापना दिनाच्या निमित्ताने १९ ते २१ मार्च या कालावधीत मनपा इमारत तसेच शहरातील प्रमुख चौकांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.














