जळगाव : भंगार बाजारातील 117 गाळेधारकांच्या पुनर्वसन, नुकसानभरपाई आणि त्यांच्या प्रलंबित कायदेशीर प्रकरणांचा अंतिम निकाल होईपर्यंत मानवीय दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय घेऊन त्यांना सन्मानाने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आज मंगळवारी असोसिएशन फॉर पीस अँड जस्टिस (एपीसीआर) महाराष्ट्रचे सचिव शाकीर शेख व एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्याकडे केली.
शिष्टमंडळाने आयुक्तांसोबत सुमारे 35 मिनिटे सविस्तर चर्चा केली. यावेळी भंगार बाजारातील 117 गाळेधारकांचे पुनर्वसन, झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई, नगरविकास खात्यातील प्रलंबित अपील, जळगाव सेशन कोर्टातील दावा तसेच औरंगाबाद खंडपीठातील प्रकरणाचा निकाल/स्टेटस को या सर्व बाबींचा विचार करून पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रमुख मागण्या
1. 117 गाळेधारकांचे तातडीने योग्य व सन्मानजनक पुनर्वसन करावे.
2. कारवाईदरम्यान झालेल्या मालमत्ता, व्यवसाय साहित्य व इतर नुकसानीची कायदेशीर पद्धतीने भरपाई द्यावी.
3. नगरविकास विभागातील प्रलंबित अपीलाचा निकाल होईपर्यंत संबंधित बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
4. जळगाव सेशन कोर्टातील प्रलंबित दाव्याचा अंतिम निकाल विचारात घ्यावा.
5. औरंगाबाद खंडपीठातील प्रकरणाचा स्टेटस/न्यायालयीन आदेश विचारात घेऊन पुढील निर्णय घ्यावा.
6. 117 गाळेधारकांचे अनेक वर्षांचे व्यवसायिक अस्तित्व, त्यांचे कुटुंबीयांचे उदरनिर्वाहाचे साधन आणि मानवीय परिस्थिती लक्षात घेऊन कायद्याच्या चौकटीत पुनर्वसनाचा मार्ग काढावा.
7. संबंधित सर्व प्रकरणे व कागदपत्रांचा संपूर्ण कायदेशीर आढावा घेऊनच पुढील कारवाई करावी.
आयुक्त आदित्य जीवने यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यासोबतच मानवतेच्या दृष्टिकोनातून जे काही शक्य आहे ते करण्याचा सकारात्मक प्रतिसाद व आश्वासन दिले.
शिष्टमंडळात ए पी सी आर तर्फे शाकीर शेख, ॲड. हमजा मिर्झा, ॲड. कलीमुद्दीन शेख, जळगाव एपीसीआर चे आरिफ देशमुख व ॲड. जफर मिर्झा, तर एकता संघटनेतर्फे फारूक शेख,अनिस शहा, हाफिज रहीम पटेल, नजमोद्दीन शेख, रज्जाक पटेल, रहीम शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.













