Advertisement

धार्मिक श्रद्धेशी खेळ करून सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांना माफी नाही

जळगाव : सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणत्याही धर्माच्या पवित्र स्थळांचा, धार्मिक प्रतीकांचा अथवा श्रद्धेचा अवमान करून समाजात तेढ व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न अजिबात सहन केला जाणार नाही. रोहित सुपरस्टार 89 इंस्टाग्राम  या नावाने दिसणाऱ्या इंस्टाग्राम आयडी वरून इस्लाम धर्माचे अत्यंत पवित्र असलेल्या मक्का-मदिन्याशी संबंधित दृश्यांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने महिलांच्या नृत्याची दृश्ये दाखविणारी रिल प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करीत एकता संघटना, जळगावने पोलीस निरीक्षक जिल्हापेठ व सायबर पोलिसांकडे तातडीने चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
एकता संघटनेच्या म्हणण्यानुसार, सदर रिल जळगाव येथील एकता संघटनेच्या कार्यालयात पाहण्यात आली.
 पवित्र धार्मिक स्थळाच्या पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह दृश्ये दाखविण्यात आली असून त्यासोबत उपहासात्मक व भावना दुखावणारा आशयही मांडण्यात आल्याचा संघटनेचा आरोप आहे. या प्रकारामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्याचे संघटनेने म्हटले आहे.
“सोशल मीडिया म्हणजे कोणत्याही धर्माची खिल्ली उडविण्याचा, पवित्र धार्मिक स्थळांचा अवमान करण्याचा किंवा दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा परवाना नाही.
 आज एका धर्माच्या पवित्र स्थळाला लक्ष्य केले तर उद्या दुसऱ्या धर्माच्या श्रद्धास्थानालाही लक्ष्य केले जाऊ शकते. अशा विकृत प्रवृत्तीला वेळीच कायद्याचा लगाम घालणे अत्यंत आवश्यक आहे,” असे एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांनी म्हटले आहे.
एकता संघटने चे समन्वयक फारुक शेख यांनी त्यांच्या नावे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,
 सायबर पोलिसांनी संबंधित इंस्टाग्राम अकाउंट व रिल चे डिजिटल पुरावे तातडीने सुरक्षित करावेत.
 तांत्रिक तपासाद्वारे या अकाउंटमागील वास्तविक व्यक्तीची ओळख पटवावी आणि चौकशीत आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६, २९९ तसेच अन्य लागू तरतुदी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील लागू तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी.
एकता संघटने चे अध्यक्ष मुफ्ती खालिद यांनी स्पष्ट केले की, ही तक्रार कोणत्याही धर्माच्या अथवा समाजाच्या विरोधात नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यासह प्रत्येक धर्माच्या श्रद्धास्थानांचा, धर्मग्रंथांचा आणि धार्मिक प्रतीकांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे.
कोणत्याही धर्माच्या देवी-देवता, प्रेषित, धर्मग्रंथ अथवा पवित्र स्थळांना जाणीवपूर्वक अश्लील किंवा अवमानकारक मजकुराशी जोडून समाजातील शांतता आणि धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध धर्म न पाहता समान आणि कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी संघटनेची भूमिका आहे.
“आमची मागणी केवळ तक्रार घेऊन प्रकरण बंद करण्याची नाही. या इंस्टाग्राम अकाउंटमागे नेमके कोण आहे? ही आक्षेपार्ह रिल कोणी तयार केली? कोणी अपलोड केली? तसेच या अकाउंटवरून यापूर्वीही धार्मिक भावना भडकविणारा मजकूर प्रसारित झाला आहे का? याची संपूर्ण सायबर चौकशी झाली पाहिजे. कायद्याच्या चौकटीत अशी प्रभावी कारवाई व्हावी की, भविष्यात कोणत्याही धर्माच्या श्रद्धेशी सोशल मीडियावर खेळ करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने शंभर वेळा विचार केला पाहिजे,” असा इशारा फारूक शेख यांनी दिला.
एकता संघटने चे हाफिज रहीम  यांनी नागरिकांनाही आवाहन केले आहे की, अशा आक्षेपार्ह रिल अथवा पोस्ट फॉरवर्ड किंवा शेअर करून त्यांचा प्रसार वाढवू नये. त्याऐवजी आवश्यक स्क्रीनशॉट, लिंक व अन्य डिजिटल पुरावे सुरक्षित करून ते पोलीस व सायबर विभागाकडे द्यावेत आणि शहरातील शांतता व सामाजिक-सांप्रदायिक सलोखा कायम राखावा.
सायबर व जिल्हापेठ येथे तक्रार
जळगाव सायबर पोलीस स्टेशन येथे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना रीतसर लेखी तक्रार सादर करण्यात आली तसेच जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांना भेटून लिखित तक्रार दाखल केली.
दोन्ही अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला संबंधीचा विरुद्ध कायदेशीर कारवाई वरिष्ठानच्या आदेशानुसार त्वरित करण्यात येईल व सदरची आयडी बंद करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांची भेट घेऊन तक्रार सादर करण्यात आली तसेच सदरची तक्रार सायबर विभागाला देण्यात आली त्यावेळी मुफ्ती खालिद त्यांच्या नेतृत्वात फारुक शेख , हाफिज रहीम पटेल, आरिफ देशमुख,अनिस शाह,मतीन पटेल,  मजहर खान, एरंडोल चे असलम पिंजारी व रहीम शेख, रज्जाक पटेल, अन्वर शिकलगर, नजमोद्दीन शेख, अमीन शेख, गुफरान मौलाना आदींची उपस्थिती होती.
Darpaan Jagat