Advertisement

जळगाव : नियमांची धूळधाण! डीजेच्या कर्णकर्कश आवाजात विसर्जन मिरवणुका; नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई कधी?

जळगाव: श्री गणरायाला निरोप देण्यासाठी शहरात विसर्जन मिरवणुकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत अनेक मंडळांनी शिस्तबद्ध पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, दुसरीकडे बंदी असतानाही सर्रास डीजे आणि लेझर लाईट्सचा वापर करून नियमांची उघडपणे धूळधाण उडवली जात आहे.

सर्वोच्च न्यायालय आणि प्रशासनाचे स्पष्ट नियम असतानाही काही मंडळांनी नियमावली पूर्णपणे धाब्यावर बसवली आहे. डीजेच्या प्रचंड आणि कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणामुळे (Noise Pollution) नागरिक, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि लहान मुले प्रचंड त्रस्त झाली आहेत.

प्रशासनाची भूमिका संशयास्पद? मिरवणुकांमध्ये नियमांचा भंग होत असताना आणि डीजेचा थरथराट चालू असतानाही पोलीस व स्थानिक प्रशासन मात्र ‘गप्प आणि मूग गिळून बघ्याची भूमिका’ घेत असल्याचे चित्र जळगावात पाहायला मिळत आहे. बंदी असूनही तरुण वर्ग प्रशासकीय नियमांची कोणतीही दखल न घेता बेधडकपणे डीजे आणि लेझरचा वापर करत आहे.

नागरिकांमधून तीव्र संताप उत्सवाचा आनंद असला तरी कायद्याचे आणि इतरांच्या आरोग्याचे भान ठेवणे तितकेच गरजेचे आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही ध्वनीप्रदूषणाची मर्यादा ओलांडली गेल्यामुळे जळगावकर संतप्त झाले आहेत. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर आणि डीजे चालकांवर प्रशासन कठोर कारवाई करणार की यंदाही केवळ बघ्याचीच भूमिका घेणार, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

Darpaan Jagat