Advertisement

घबाडकुंड’ ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स; १९ जून २०२६ रोजी होणार प्रदर्शित!

घबाडकुंड’ ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स; १९ जून २०२६ रोजी होणार प्रदर्शित!

हॉलीवूड आणि बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही दमदार एन्ट्री . ‘घबाडकुंड’ या चित्रपटाच्या माध्यमातून हा अनोखा प्रयोग पहिल्यांदाच साकारला जात आहे. परस्परांशी जोडलेल्या कथानकांमधून एक भव्य आणि रहस्यमय कथा उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.रसिक कदम यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा चित्रपट १९ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. इंस्टाग्राम (Instagram), फेसबुक (Facebook) आणि यूट्यूब (YouTube) यांसारख्या सर्वच ऑनलाइन पोर्टल्सवर या ट्रेलरला रसिक प्रेक्षकांचा जोरदार आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र याच चित्रपटाची हवा असून ट्रेलरमधील रहस्य आणि थरार पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे.. या चित्रपटात देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर आदी कलाकारांची फौज आहे.तर संजय नवगिरे, अक्षय धरमपाल हे या चित्रपटाचे लेखक आहेत. गीतकार नयूम पठाण आहेत. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचे आहे. चित्रपटातील कलाकारांचा लूक आणखी प्रभावी करण्यासाठी अभिषेक पवार यांनी मेकअप आणि प्रोस्थेटिक (Make-up and Prosthetic) ची तर वैदेही जाधव यांनी कॉस्च्युम (Costume) डिझाईनची उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली आहे.दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजय येणारे पाटील यांनी असोसिएट डायरेक्टर (मुख्य सह-दिग्दर्शक) आणि पवन खंबायत  यांनी असिस्टंट डायरेक्टर (सहाय्यक दिग्दर्शक) म्हणून या चित्रपटासाठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटाच्या ॲक्शन सीन्सचे दिग्दर्शन केले असून बॅकग्राउंड म्युझिकची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे. रि-रेकॉर्डिंग मिक्सर सुजित शिंगारे व साउंड डिझाईन मानव श्रोत्रिय (एमपीएससी) यांचे आहे. मॅनेजर विष्णू घोरपडे आहेत.’आयकॉन दी स्टाइल’ या निर्मिती संस्थेमार्फत मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करताना रसिक कदम यांनी हा चित्रपट वेगळा आणि रोमहर्षक अनुभव देईल, असा विश्वास व्यक्त केला. दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी मराठीत ‘युनिव्हर्स’ चित्रपट करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. मराठीसह दाक्षिणात्य भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, मोठ्या कॅनव्हासवरील हा प्रयोग प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

 

Darpaan Jagat