Advertisement

हॉटेल चालकाचा नकार नडला! जामनेरात तिघांकडून हॉटेल कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला

जामनेर: जामनेर तालुक्यातील टाकळी रस्त्यावरील ‘आर्यन हॉटेल’मध्ये मध्यरात्री एका क्षुल्लक कारणावरून तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेल चालकाने मध्यरात्री दारू आणि जेवण देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तिघा संशयितांनी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत हॉटेलच्या दरवाजा-खिडक्यांची तोडफोड केली. या प्राणघातक हल्ल्यात राजू लखू पवार हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश माळी, मयूर शिवदे आणि मनोहर राऊत (सर्व रा. जामनेर) हे तिघे मध्यरात्रीच्या सुमारास टाकळी रस्त्यावरील आर्यन हॉटेलमध्ये गेले होते. तेथे त्यांनी कर्मचाऱ्यांकडे दारू आणि जेवणाची मागणी केली. मात्र, वेळ उलटून गेल्याने हॉटेल चालकाने त्यांना सेवा देण्यास असमर्थता दर्शवली. यावरून संशयितांनी हॉटेल कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली.वाद विकोपाला गेल्यावर आरोपींनी हॉटेलच्या खिडक्या आणि दरवाजांची तोडफोड केली. या गोंधळादरम्यान कल्पेश माळी याने धारदार शस्त्राने राजू पवार यांच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भागावर वार केला. या प्राणघातक हल्ल्यामुळे पवार रक्ताच्या थारोळ्यात पडले.हॉटेलमध्ये झालेल्या या संपूर्ण राड्याचा आणि तोडफोडीचा थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी बाधीत कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून कल्पेश माळी, मयूर शिवदे आणि मनोहर राऊत यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Darpaan Jagat