जळगाव: जळगाव शहरातील खेडी बुद्रुक परिसरातील माऊली नगर भागात दुचाकीच्या लाईटवरून झालेल्या किरकोळ वादातून एकावर अत्यंत क्रूरपणे चॉपरने वार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या रक्तरंजित हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (MIDC Police) पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत धडक कारवाई करत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेहमीची घटना कशी घडली?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास खेडी बुद्रुक येथील माऊली नगर परिसरात काही नागरिक बसले होते. दरम्यान, आरोपी मयूर चैत्राराम जाधव हा त्याच्या मोटारसायकलवरून तेथे आला. त्याच्या गाडीचा लाईट वारंवार सुरू-बंद होत होता व तो डोळ्यावर लागत असल्यामुळे उपस्थित नागरिकांनी त्याला याबद्दल जाब विचारला.
या साध्या आणि किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही वेळातच विकोपाला गेला. संतापलेल्या आरोपीने आपल्या जवळील धारदार चॉपर काढून उपस्थित लोकांवर बेछूट वार करण्यास सुरुवात केली.
एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
या अचानक झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात किरण विठ्ठल पाटील (वय ४४, रा. माऊली नगर, खेडी बुद्रुक) हे गंभीर जखमी होऊन जागीच मृत पावले. तर त्यांच्यासोबत असलेले किशोर छगन पाटील (वय ३५, रा. माऊली नगर, खेडी बुद्रुक) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे खेडी बुद्रुक परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे.
एमआयडीसी पोलिसांची तत्पर व धडाकेबाज कारवाई
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला आणि तात्काळ तपासाची चक्रे वेगाने हलवली.
तांत्रिक विश्लेषन आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी मयूर चैत्राराम जाधव (रा. माऊली नगर, खेडी बुद्रुक, जळगाव) याला जेरबंद केले आहे. पुढील कायदेशीर कारवाई एमआयडीसी पोलिसांकडून सुरू असून परिसतात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.












