जळगाव : एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमध्ये असलेल्या ‘श्री आनंद बॅटरी’ कंपनीत चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. आरोपींकडून चोरीला गेलेल्या शिशाच्या धातूच्या १६ विटा तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी काय होती घटना?
दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ ते १ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान एमआयडीसीतील ई-सेक्टर, गोपालदास मिल चौकाजवळील ‘श्री आनंद बॅटरी’ या कंपनीत ही धाडसी चोरी झाली होती. कंपनीचे मालक लखन वासुदेव बुधानी (वय ५०, रा. कंवर नगर, जळगाव) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात चोरट्यांनी कंपाऊंडची जाळी तोडून आत प्रवेश केला आणि १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या, सुमारे ५०० किलो वजनाच्या शिशाच्या धातूच्या २० विटा लंपास केल्या होत्या.
पोलीस तपास आणि आरोपींना अटक
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून सीसीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तांब्रापुरा परिसरातील संशयितांचा माग काढला.
या सहा जणांना घेतली ताब्यात:
-
आसिफ शहा सिकंदर शहा (रा. फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव)
-
मोहसीन शाह सिकंदर शाह (रा. फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव)
-
महेश उर्फ बापु संतोष भोई (रा. तांबापुरा, जळगाव)
-
मुकेश राजु परमार (रा. गौतम नगर, तांबापुरा, जळगाव)
-
शेख आबिद शेख मोहम्मद (रा. फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव)
-
शकील शहा रुबाब शहा (रा. बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव)
मुद्देमाल जप्त
संशयितांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ९७ हजार ५०० रुपये किमतीच्या ३९० किलो वजनाच्या १६ शिशाच्या विटा आणि चोरीसाठी वापरलेली ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पो.उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पो.उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हवालदार गिरीश पाटील, प्रमोद लाडवंजारी, रामकृष्ण पाटील, किरण चौधरी, मोतीलाल बोरसे, पोलीस अंमलदार शशिकांत मराठे व रमाकांत साळुंखे यांच्या पथकाने केली.














