हवामान खात्याच्या सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रभर मनोरंजनाचे दाट ढग जमा होत असून, करमणुकीचा पहिला मुसळधार पाऊस १९ जूनपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बरसणार आहे!
सूत्रांच्या माहितीनुसार हे मनोरंजनाचे ढग तुफान हास्य, रहस्य, थरार आणि कौटुंबिक भावनांनी भरलेले असून, १९ जूनपासून किमान १०० दिवस चित्रपटगृहांवर त्यांचा मुक्काम असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.
त्यामुळे प्रेक्षकांनी छत्र्या घरीच ठेवाव्यात आणि १९ जूनपासून ‘घबाडकुंड’च्या मनोरंजनाच्या पावसात मनसोक्त भिजण्यासाठी सज्ज व्हावे!या चित्रपटात देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर आदी कलाकारांची फौज आहे.तर संजय नवगिरे, अक्षय धरमपाल हे या चित्रपटाचे लेखक आहेत. गीतकार नयूम पठाण आहेत. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचे आहे. चित्रपटातील कलाकारांचा लूक आणखी प्रभावी करण्यासाठी अभिषेक पवार यांनी मेकअप आणि प्रोस्थेटिक (Make-up and Prosthetic) ची तर वैदेही जाधव यांनी कॉस्च्युम (Costume) डिझाईनची उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली आहे.दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजय येणारे पाटील यांनी असोसिएट डायरेक्टर (मुख्य सह-दिग्दर्शक) आणि पवन खंबायत यांनी असिस्टंट डायरेक्टर (सहाय्यक दिग्दर्शक) म्हणून या चित्रपटासाठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटाच्या ॲक्शन सीन्सचे दिग्दर्शन केले असून बॅकग्राउंड म्युझिकची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे. रि-रेकॉर्डिंग मिक्सर सुजित शिंगारे व साउंड डिझाईन मानव श्रोत्रिय (एमपीएससी) यांचे आहे. मॅनेजर विष्णू घोरपडे आहेत.’आयकॉन दी स्टाइल’ या निर्मिती संस्थेमार्फत मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करताना रसिक कदम यांनी हा चित्रपट वेगळा आणि रोमहर्षक अनुभव देईल, असा विश्वास व्यक्त केला. दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी मराठीत ‘युनिव्हर्स’ चित्रपट करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. मराठीसह दाक्षिणात्य भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, मोठ्या कॅनव्हासवरील हा प्रयोग प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.












