जळगाव: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), जळगाव येथील मुख्य इमारतीच्या भिंतीला लागून असलेल्या कचरा संकलन केंद्रामुळे (कचरा डेपो) विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून, प्रशिक्षणार्थ्यांना जेवण करणे आणि वर्गात बसणेही कठीण झाले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका आयुक्तांना आणि जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य रुग्णसेवा व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने जाहीर विनंती पत्र देऊन निवेदन सादर करण्यात आले.
भटके कुत्रे आणि दुर्गंधीचा मोठा त्रास
या निवेदनात दोन मुख्य मागण्या मांडण्यात आल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे आयटीआयच्या भिंतीला लागून असलेले कचरा संकलन केंद्र तातडीने दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावे. पावसाचे पाणी कचऱ्यात साचल्याने परिसरात आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे संस्था परिसरात मोठ्या संख्येने भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या कुत्र्यांमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
१० दिवसांचा अल्टिमेटम; ‘अर्ध नग्न उपोषणाचा’ इशारा
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा आणि आरोग्याचा विचार करून प्रशासनाने पुढील १० दिवसांच्या आत हे कचरा संकलन केंद्र तिथून हटवावे, अशी आग्रहाची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत हा कचरा डेपो न हटवल्यास, कायदेशीर मार्गाने ‘अर्ध नग्न उपोषण’ करण्याचा आक्रमक इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.
संघटनेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित
महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन देताना महाराष्ट्र राज्य रुग्णसेवा व श्रमिक कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष समाधान भाऊ पवार, जिल्हा सचिव चंद्रकांत पाटील, शहर अध्यक्ष पवन खंबायत, शहर उपाध्यक्ष कल्पेश व्हिरोडकर, जळगाव शहर सचिव नंदकिशोर पाटील आणि इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या समस्येचे गांभीर्य ओळखून या पत्राच्या प्रती स्थानिक आमदार राजूमामा भोळे आणि जळगाव मनपाचे महापौर यांनाही पुढील त्वरित कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.












