जळगाव: जसे पार्वती मातेने घडविले गणपती बाप्पाला तसेच आमचे चिमुकले विद्यार्थी व त्यांच्या आईने घडविले शाळूचे बाप्पा……
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण पूरक शाळूच्या मातीची गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा लोक शिक्षण मंडळ जळगाव संचलित स्वा.सै.ज. सु. खडके प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे आज आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत विद्या मंदिराच्या उपशिक्षिका सौ. पुनम पाटील यांनी एकूण 65 विद्यार्थी व त्यांच्या आईला गणपती कसा बनवावा यासंबंधी मार्गदर्शन केले. सर्वच विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनानुसार व स्वकल्पनेनुसार अतिशय सुंदर व आकर्षक अशा गणेश मूर्ती स्वतःच्या हातांनी साकारल्या. तयार झालेल्या सर्व गणेशमूर्तींचे परीक्षण करून प्रथम क्रमांक कृतिका योगेश कासार ,द्वितीय क्रमांक गौरव लक्ष्मण पाटील, तृतीय क्रमांक हेमांगी नारायण पाटील असे क्रमांक काढण्यात आले. तसेच उत्कृष्ट मूर्ती तयार करणाऱ्या दोन माता पालकांचे उत्तेजनार्थ क्रमांक काढले
प्रस्तुत उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व कलागुणांना वाव मिळाला. तसेच पीओपीच्या मूर्ती न वापरता पर्यावरण पूरक शाळूच्या गणेश मूर्ती वापरून गणेशोत्सव साजरा करावा व पर्यावरणाचे रक्षण करावे असा संदेश देण्यात आला.
सदर उपक्रमासाठी विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री सुनील पवार सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.














