जळगाव : श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या फुटबॉल मैदानासाठी आकारण्यात येणारे प्रतिदिन रु. १० हजार शुल्क हे राज्यस्तरीय आंतरजिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेसाठी कमी करून पूर्वीप्रमाणे ६ हजार आकारण्यात यावे, अशी मागणी जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात राज्यस्तरीय आंतरजिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, या स्पर्धेसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिला फुटबॉल संघ व खेळाडू सहभागी होणार आहेत. अशा राज्यस्तरीय स्पर्धेमुळे जळगाव जिल्ह्यातील फुटबॉल खेळाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक महिला खेळाडूंनाही प्रोत्साहन व प्रेरणा मिळणार आहे.
मात्र, नव्याने तयार झालेल्या फुटबॉल मैदानासाठी प्रतिदिन १० हजार शुल्क आकारण्यात येत असल्याने स्पर्धेच्या आयोजकांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. स्पर्धेदरम्यान खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था, पंच व अधिकाऱ्यांचा खर्च, वैद्यकीय सुविधा, पाणी, वाहतूक, स्पर्धा व्यवस्थापन यासह अनेक बाबींवर आधीच मोठा खर्च करावा लागतो.
“शासकीय क्रीडा मैदाने ही केवळ महसूल मिळविण्याचे साधन नसून खेळाडू घडविण्याचे आणि खेळाचा विकास करण्याचे माध्यम आहेत. त्यामुळे राज्य व जिल्हास्तरीय अधिकृत क्रीडा स्पर्धांना व्यावसायिक कार्यक्रमांप्रमाणे शुल्क आकारणे योग्य ठरणार नाही,” अशी भूमिका सचिव फारूक शेख यांनी मांडली आहे.
विशेषतः महिला फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जात असताना, राज्यस्तरीय महिला स्पर्धेच्या आयोजनासाठी मैदानाच्या शुल्कात सवलत देणे आवश्यक आहे. मैदानाचे शुल्क जास्त असल्यामुळे अधिकृत संघटनांना स्पर्धा आयोजित करणे आर्थिकदृष्ट्या कठीण होऊ नये, याचाही प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, असे संघटनेने म्हटले आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी घुगे यांनी सकारात्मक भूमिका घेत १० हजार प्रतिदिन शुल्काऐवजी पूर्वीप्रमाणे ६ हजार प्रतिदिन शुल्क आकारावे आणि राज्यस्तरीय आंतरजिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करावे, अशी मागणी जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने यांनी केली आहे.















