मुंबई: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडून महाराष्ट्रातील ऐतिहासिक सहकार चळवळ आणि नागरी सहकारी बँकांचे जाळे मोडून काढण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँका व अपेक्स बँकेची मालमत्ता एका बिगर बँकिंग वित्तीय कंपनीच्या (NBFC) घशात घालून राज्यातील सहकार क्षेत्र कंगाल केले जात असल्याचा आरोप करत, याप्रकरणी अमित शाह यांना पुराव्यांसह पत्र पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-
महाराष्ट्रातील सहकार संपवण्याचे षडयंत्र मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी केंद्र व राज्यातील महायुती सरकारवर कडक ताशेरे ओढले. अलिकडच्या काळात बदनाम झालेल्या व बुडीत निघालेल्या बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी आणि ठराविक बँकांना फायदा पोहोचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा राबवली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
गुजरातमधील माधवपुरा बँकेसारखे घोटाळे झाकण्यासाठी महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व धोक्यात आणले जात आहे. सहकाराशी कसलाही संबंध नसलेल्या खाजगी एनबीएफसी कंपनीच्या घशात महाराष्ट्रातील सहकारी बँकांची अब्जावधींची संपत्ती घातली जात आहे. धनंजयराव गाडगीळ यांच्यासारख्या दिग्गजांनी उभारलेली ही चळवळ संपवून अमित शाह या क्षेत्राचे ‘बादशाह’ बनू पाहत आहेत, असा थेट हल्लाबोल राऊत यांनी केला.
-
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका महाराष्ट्राच्या या नुकसानावर राज्यातील सत्ताधारी मौन बाळगून असल्याबद्दल राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व धोक्यात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत जाऊन या निर्णयांचे स्वागत करत आहेत, ही लाजीरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राची ओळख असणारी साखर कारखानदारी आणि सहकार चळवळ बळकावून राज्याला गुजरातच्या दारात कटोरा घेऊन उभे करण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोपही त्यांनी केला.
-
‘धनुष्यबाण’ चोरी हा संघटित गुन्हा; मकोका लावा! शिवसेनेचे अधिकृत चिन्ह ‘धनुष्यबाण’ गोठवणे व चोरणे हा एक संघटित गुन्हा (Organised Crime) असल्याचे सांगत राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. अमित शाह, तत्कालीन निवडणूक आयुक्त आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून हा दरोडा टाकला असून त्यांच्यावर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. चोराला पकडल्यानंतर पोलीस आधी मुद्देमाल जप्त करतात, त्याचप्रमाणे आधी चोरलेला धनुष्यबाण जप्त करा, असा टोला त्यांनी लगावला.
-
राष्ट्रपती व पंतप्रधानांना प्रबोधनकारांचे पुस्तक भेट देणार राष्ट्रपती भवनात बुवाबाजीला स्थान दिले जात असल्याचा आरोप करत खासदार राऊत यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. घटनात्मक पदांवरील व्यक्तींना वैचारिक प्रबोधनाची गरज असून, राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रबोधनकार ठाकरे लिखित ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ हे पुस्तक भेट पाठवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पुस्तकाचे इंग्रजी आणि हिंदी अनुवाद करून ते देशभर पोहोचवले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
-
नारायण राणे मानहानी खटला आणि राजकीय घडामोडी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संबंधित मानहानीच्या खटल्याबाबत बोलताना, माझगाव न्यायालयात राणे यांच्या वकिलांनी सामोपचाराने तडजोड करण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती त्यांनी दिली. हा लढा आत्मसन्मानाचा असून, अधिकृत प्रस्ताव समोर आल्यावरच यावर निर्णय घेतला जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
तसेच, निधी मिळत नसल्याच्या तक्रारी करणाऱ्या आमदारांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान देत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या सरकारची उलटी गिनती सुरू झाली असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.














