Advertisement

पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायचे ५० हजार रुपये चोरीला; दोन संशयित महिलांवर संशय

चाळीसगाव:
येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या पिशवीतून अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या धाडसी चोरीमुळे पोस्ट कार्यालय परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ब्लेडने पिशवी कापून केली चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, रेहानाबी शेख या महिला गुरुवारी पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्याकडे कापडी पिशवीत ५० हजार रुपयांची रोकड होती. पोस्टातील व्यवहार पूर्ण करण्याच्या गडबडीत त्या असताना, अज्ञात दोन महिलांनी त्यांच्या पिशवीला ब्लेड मारले. पिशवी कापून आतील सर्व रोकड काढून घेत या महिलांनी पोबारा केला. गर्दी आणि घाईगडबडीमुळे रेहानाबी यांच्या हा प्रकार तातडीने लक्षात आला नाही.
CCTV मध्ये संशयित महिला कैद
पैसे चोरीला गेल्याचे समजताच परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोस्ट ऑफिसमधील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची पाहणी केली असता, दोन संशयित महिला रेहानाबी यांच्याजवळ संशयास्पद हालचाली करताना आणि गर्दीचा फायदा घेताना स्पष्टपणे दिसून आल्या आहेत.
शहर पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी पीडित महिला रेहानाबी शेख यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोन्ही संशयित महिलांचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
“पोस्ट ऑफिस, बँक किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी रोख रकमेचे व्यवहार करताना नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे. आपल्या मौल्यवान वस्तू आणि पैशांच्या पिशवीवर सतत लक्ष ठेवावे,” असे आवाहन चाळीसगाव शहर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
Darpaan Jagat