Advertisement

पोलीस विभागात तब्बल ८१ हजारहून अधिक रिक्त पदांवर भरती

 

योगी सरकारने पोलीस विभागात तब्बल ८१ हजारहून अधिक रिक्त पदांवर भरती करण्याची घोषणा केली आहे.

पोलीस विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. यामुळे यूपी पोलीस दल अधिक आधुनिक, तरुण आणि सक्षम होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केवळ भरतीच नाही, तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक कडक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत. त्यांनी ‘११२’ या आपत्कालीन सेवेचा रिस्पॉन्स टाइम कमी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या पोलीस मदतीसाठी सरासरी ६ मिनिटांत पोहोचतात, हा वेळ आणखी कमी करून गुन्हेगारांवर वचक बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

तसेच, लखनौमध्ये मुख्यमंत्री निवास आणि पोलीस मुख्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अनेक वर्षांपासून तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेशही त्यांनी दिले आहेत, जेणेकरून कामात नवीन ऊर्जा आणि पारदर्शकता येईल.येत्या वर्षभरात ४,५०० उपनिरीक्षकांसह हजारो जवानांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच रेल्वे पोलिसांच्या ‘ऑपरेशन मुस्कान’ द्वारे २,३२५ हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांशी मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. जर तुम्हीही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर आता अभ्यासाला लागा, कारण यूपी पोलिसात भरती होण्याची ही सर्वात मोठी संधी आहे.या मेगा भरतीमध्ये उपनिरीक्षक (SI), नागरिक पोलीस कॉन्स्टेबल, रेडिओ सहाय्यक ऑपरेटर, संगणक ऑपरेटर ग्रेड-ए आणि गोपनीय पोलीस उपनिरीक्षक अशा विविध श्रेणींमधील पदांचा समावेश आहे. काही पदांसाठी भरती प्रक्रिया आधीच सुरू झाली असून उर्वरित जागांसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.

मुख्यमंत्री योगी यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ही संपूर्ण भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष आणि आरक्षणाच्या नियमांनुसार वेळेत पूर्ण झाली पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर करून भरतीमध्ये कोणताही गोंधळ होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी भरती बोर्डाला दिल्या आहेत.

Darpaan Jagat