Advertisement

‘नशामुक्त भारत’ अंतर्गत जळगाव पोलिसांचा मोठा दणका; एमडी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू!

जळगाव: शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या साखळीविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि जिल्हापेठ पोलीस यांच्या संयुक्त पथकाने आज (१० जुलै) पहाटे शासकीय तांत्रिक विद्यालयाजवळील जी.एस. ग्राऊंड परिसरात सापळा रचून ही धडक कारवाई केली. या कारवाईत ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत पोलिसांनी एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, रॅकेटमधील एका फरार मुख्य संशयिताचा शोध घेतला जात आहे.

अंधाराचा फायदा घेत एक जण फरार, दोघे ताब्यात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जी.एस. ग्राऊंड परिसरात मध्यरात्रीनंतर फिल्डिंग लावली होती. पहाटेच्या सुमारास एका मोटारसायकलवरून तिघे संशयित येताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरी ओम नगर) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचन नगर) या दोघांना जाळ्यात ओढले.

त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन पावडर आढळून आली. घटनास्थळी पाचारण करण्यात आलेल्या फॉरेन्सिक पथकाने प्राथमिक तपासणी केली असता, जप्त केलेला पदार्थ ‘एमडी’ ड्रग्ज असल्याचे स्पष्ट झाले.

३ लाखांचा मुद्देमाल जप्त; मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू या कारवाईत पोलिसांनी २ लाख ८१ हजार ५४० रुपये किमतीचे ‘एमडी’ ड्रग्ज आणि २५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक: MH-19-DJ-0132) असा एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक चौकशीत, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हे ड्रग्ज भैय्या सोनवणे (रा. कांचन नगर) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. पोलीस आता फरार भैय्या सोनवणेचा कसून शोध घेत असून, या रॅकेटमध्ये शहरात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

अटक केलेला आरोपी सराईत गुन्हेगार अटक करण्यात आलेला जयेश तायडे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, गंभीर दुखापत आणि दरोड्यासारखे अनेक गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद आहेत. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या पथकाने केली उल्लेखनीय कामगिरी सदरची धडक कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, दीपक जगदाळे, जितेंद्र वल्टे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हेमराज भावसार, तसेच पोलीस अंमलदार अकरम शेख, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, महेश महाजन, विजय पाटील, किशोर पाटील, छगन तायडे, प्रदीप सपकाळे, राहुल रगडे आणि उदय कापडणे यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Darpaan Jagat