Advertisement

धक्कादायक! प्लॉट खरेदीच्या बहाण्याने विवाहितेला जाळ्यात ओढलं; मौलानासह ३ जणांवर गुन्हा!

नागपूर: भारतीय वायू सेनेच्या एका अधिकाऱ्याच्या २४ वर्षीय पत्नीचे लैंगिक शोषण करून, तिचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग करणे, लाखो रुपयांची खंडणी उकळणे आणि बळजबरीने धर्मांतर करायला लावल्याचा एक अतिशय धक्कादायक आणि गंभीर प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागपूरच्या सोनेगाव पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्र फिरवत दोन नराधमांना अटक केली असून, एका फरार मौलानाचा शोध सुरू केला आहे.
प्लॉट खरेदीच्या बहाण्याने जाळं, गुंगीचं औषध देऊन अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २४ वर्षीय विवाहित महिला नागपूर भागात प्रॉपर्टी डिलिंगचे (Real Estate) काम करते. तिचे पती भारतीय वायू सेनेत (IAF) अधिकारी असून ते सध्या कर्तव्यावर दुसऱ्या शहरात कार्यरत आहेत. याचाच फायदा घेत फेब्रुवारी २०२५ मध्ये मुख्य आरोपी अयाज ताज मदारे याने प्लॉट खरेदी करायचा असल्याचे सांगून पीडितेशी संपर्क साधला. त्यानंतर तिला वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. तिथे तिच्या पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. एवढेच नव्हे तर नराधमाने या कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील तयार केले.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आणि ३ लाखांची खंडणी
अत्याचाराचे व्हिडिओ समोर आणण्याची आणि पतीला दाखवण्याची धमकी देऊन आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. भीतीपोटी महिलेने आरोपीला वेळोवेळी तब्बल ३.०९ लाख रुपये दिले. या पैशांनंतरही आरोपीची हाव संपली नाही आणि त्याने पीडितेवर वारंवार बळजबरीने अत्याचार चालूच ठेवला.
जबरदस्तीने केले धर्मांतर
या प्रकरणातील धक्कादायक वळण म्हणजे आरोपीने पीडितेवर धर्मांतरासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. मे २०२५ मध्ये तिला नागपूरजवळील एका गुप्त ठिकाणी नेण्यात आले. तिथे काही धार्मिक विधी उरकून तिचे धर्मांतर करण्यात आल्याचा दावा आरोपींनी केला. या संपूर्ण कटात स्थानिक मौलानाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
पतीला सांगितली आपबिती, २ आरोपींना बेड्या
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित काही व्हिडिओ व्हायरल झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर पीडितेने धीर एकवटून संपूर्ण प्रकार आपल्या पतीला फोनवर सांगितला. पतीने तात्काळ नागपूर गाठून पत्नीसह सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ बलात्कार, खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि बेकायदेशीर धर्मांतर विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अयाज ताज मदारे आणि त्याला मदत करणारा अमीन शेख या दोघांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील तिसरा आरोपी हजर मौलाना हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Darpaan Jagat