जळगाव, प्रतिनिधी: जामनेरच्या मातीतून अभिनय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवत पुढे आलेले अभिनेते ईश्वर चौधरी म्हणजे जामनेरचा कोहिनूर हिरा! तब्बल तीन वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सातत्याने मेहनत, संघर्ष आणि धडपड करणाऱ्या ईश्वर चौधरी यांच्या या मेहनतीला अखेर मानाची पावती मिळाली आहे. त्यांच्या दमदार अभिनयाची दखल घेत त्यांना ‘बेस्ट अॅक्टर – दादासाहेब फाळके अवॉर्ड २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृह, डी. वाय. पाटील हॉस्पिटलजवळ आयोजित दिमाखदार कार्यक्रमात ‘स्वराज्य फिल्म प्रॉडक्शन संघटना (महाराष्ट्र)’ यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
तीन वर्षांचा संघर्ष… मुंबई-पुण्याच्या कित्येक फेऱ्या! अभिनय क्षेत्रात नाव कमावणे सोपे नसते. गेल्या तीन वर्षांपासून ईश्वर चौधरी यांनी या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी अथक मेहनत घेतली. कामाच्या शोधात आणि अभिनयाच्या संधींसाठी त्यांनी अनेक वेळा मुंबई आणि पुण्याच्या फेऱ्या मारल्या. अनेकदा प्रयत्न करूनही अपेक्षित संधी मिळत नव्हती; मात्र त्यांनी हार मानली नाही. ‘आज नाही तर उद्या आपली वेळ येईल’ या विश्वासाने त्यांनी संघर्ष सुरूच ठेवला. अखेर त्यांच्या मेहनतीला यशाची पहिली मोठी झळाळी मिळाली. त्यामुळे हा पुरस्कार केवळ एक सन्मान नसून, त्यांच्या तीन वर्षांच्या संघर्षाला मिळालेली मानाची पावती आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील भूमिकेने वेधले लक्ष ईश्वर चौधरी यांनी झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेत गुंडाची भूमिका साकारून आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली. त्यानंतर खान्देशी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘गुल्हेर’ आणि ‘गुल्हेर-२’ या चित्रपटांमध्ये त्यांनी लीड हिरो म्हणून भूमिका साकारली आहे. तसेच ‘जब्या’, ‘अपहरण’ यांसह विविध शॉर्ट फिल्म्समध्येही त्यांनी प्रमुख भूमिका वधवल्या आहेत.
सामाजिक बांधिलकी आणि अभिनयाचा संगम अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपत गरजू आणि दीनदुबळ्यांसाठी काम करण्याची त्यांची धडपडही उल्लेखनीय आहे. कला आणि समाजकार्याचा हा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी वेगळी ओळख देतो.
जामनेरच्या मातीतून पुढे आलेल्या ईश्वर चौधरी यांच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यातून आणि चित्रपटसृष्टीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जामनेरचा हा कोहिनूर हिरा भविष्यातही आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.














