Advertisement

जळगावात मानवी संवेदनांचा अनोखा सोहळा: पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मुलांच्या पुढाकाराने डंपिंग ग्राउंडवरील मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

जळगाव: समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता आणि खरी माणुसकी जपणारा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम नुकताच जळगावात राबविण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या शासकीय निवासस्थानी डंपिंग ग्राउंड परिसरात राहणाऱ्या आणि कचरा वेचून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांतील लहान मुलांना विशेष निमंत्रित करण्यात आले. यावेळी मुलांना नवीन कपडे, शूज आणि मिठाईचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलविण्यात आले.

सानिका आणि अर्णव धिवरे यांचा प्रेरणादायी पुढाकार

हा संवेदनशील सामाजिक उपक्रम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची कन्या सानिका धिवरे आणि मुलगा अर्णव श्रीकांत धिवरे यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. डंपिंग ग्राउंड परिसरातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या चिमुकल्यांना थेट शासकीय निवासस्थानी बोलावून त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालविण्याचा हा अभिनव प्रयोग होता.

पोलीस अधीक्षकांनी साधला मुलांशी आस्थेने संवाद

या कार्यक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः खाली बसून मुलांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी मुलांच्या शिक्षणाची सद्यस्थिती, कौटुंबिक अडचणी आणि भविष्यातील स्वप्नांविषयी अत्यंत आस्थेने चौकशी केली. यानंतर मुलांना नवीन कपडे, शूज आणि मिठाई भेट देत त्यांचा आनंद द्विगुणित केला.

“केवळ वस्तूंचे वाटप न करता मुलांच्या भावना समजून घेणे, त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.”

समाजासमोर आदर्श

सामान्यतः समाजाच्या नजरेपासून दूर राहणाऱ्या या मुलांना मुख्य प्रवाहात सन्मानाची वागणूक देत त्यांच्यासोबत आनंद वाटून घेण्याचा हा प्रयत्न उपस्थितांची मने जिंकणारा ठरला. सानिका आणि अर्णव यांच्या या संवेदनशील विचारांचे आणि सामाजिक जाणीवेचे सर्वत्र कौतुक होत असून, हा उपक्रम खऱ्या अर्थाने समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.

Darpaan Jagat