Advertisement

जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील भंगाळेंची बिनविरोध निवड

जळगाव : जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील भंगाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. केमिस्ट भवन येथे झालेल्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केमिस्ट सभासदांच्या आग्रही भूमिकेमुळे एकमताने ही निवड करण्यात आली. याच निवडीत उपाध्यक्षपदी संदीप बेदमुथा तर कोषाध्यक्षपदी दिनेश मालू यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.ही संपूर्ण निवड आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी भानुदास नाईक, सुरेंद्र बोहरा (पारोळा) आणि अशोक जैन यांनी निवडणूक अधिकारी व मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. या निवडीमुळे केमिस्ट बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून, जिल्ह्यासह राज्यभरातून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सुनील भंगाळे हे गेल्या २५ ते ३० वर्षांपासून जिल्हा केमिस्ट संघटनेत विविध पदांवर कार्यरत असून त्यांनी संघटनेच्या बळकटीसाठी सातत्याने योगदान दिले आहे. केमिस्ट बांधवांच्या विविध प्रश्नांवर पाठपुरावा करणे, संघटनात्मक कार्याला गती देणे तसेच सामाजिक उपक्रम राबविणे या माध्यमातून त्यांनी संघटनेला वेगळी ओळख मिळवून दिली आहे.केमिस्ट हृदयसम्राट आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सचिव अनिल झंवर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावी नेतृत्व केले असून संघटनेतील सदस्यांचा त्यांच्यावर कायम विश्वास राहिला आहे.संघटनात्मक कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही विविध उपक्रम राबविल्यामुळे सुनील भंगाळे यांच्या कार्याचा जिल्हा तसेच राज्य पातळीवर गौरव झाला असून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.बिनविरोध निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुनील भंगाळे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Darpaan Jagat