Advertisement

IPL च्या सामन्यांचे आयोजन करण्यास कर्नाटक राज्य शासनाकडून परवानगी.

बंगळुरू : बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमला अखेर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या हंगामातील सामन्यांचे आयोजन करण्याची परवानगी मिळाली आहे. कर्नाटक राज्य शासनाने सोमवारी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेसह केलेल्या बैठकीनंतर याविषयी घोषणा केली. त्यामुळे बंगळुरू येथे पाच साखळी सामन्यांसह बाद फेरीतील दोन सामन्यांचे आयोजनदेखील केले जाणार आहे, असे समजते.

काही दिवसांपूर्वीच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ८६ हजारांहून अधिक दर्दी क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने रंगलेल्या टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. क्रांती घडवण्यासह इतिहासाची पुनरावृत्ती करून यंदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

आता सर्वांना आयपीएलच्या १९व्या हंगामाचे वेध लागले आहेत. २८ मार्चपासून आयपीएलचा १९वा हंगाम सुरू होईल. विराट कोहलीचा समावेश असलेला आणि रजत पाटिदारच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू संघ अपेक्षेप्रमाणे स्पर्धेचा सलामीचा सामना खेळणार आहे. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत बंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघ रविवार, २९ मार्च रोजी आपल्या अभियानास प्रारंभ करेल. त्यांची वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सशी गाठ पडेल.

मात्र गतवर्षी बंगळुरूने जेतेपद मिळवल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा बळी गेला होता. त्यामुळेच या स्टेडियमवर बंदी घालण्यात आली होती. कारण येथील प्रेक्षकक्षमता झेलण्याइतपत कर्नाटक पोलिसांनी असहकार्य दर्शवले होते. आता वर्षभराने अखेरीस चिन्नास्वामीवरील बंदी उठवण्यात आली आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल, तमिळनाडू व आसाम येथे निवडणुका होणार असल्याने बीसीसीआय पुढील वेळापत्रक काही कालावधीनंतर जाहीर करणार आहे. एकूण १६ दिवसांचे वेळापत्रक तूर्तास जाहीर करण्यात आले असून या दरम्यान २० सामने खेळवण्यात येतील.

पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने आपल्या सराव शिबिराला सुरुवात केली. तूर्तास हा संघ नवी मुंबई येथे सराव करत असून लवकरच वानखेडेवर सर्व खेळाडूंच्या सरावास प्रारंभ होईल.

Darpaan Jagat