जळगाव: दिवाळीचा सण आनंद आणि उत्साहात साजरा होत असतानाच, जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर झालेली आतषबाजी आणि फटाक्यांच्या अतिवापरामुळे शहरात वायू आणि ध्वनी प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. हवेची गुणवत्ता खालावली असतानाच, शहरातील खराब रस्ते, धुळीचा त्रास आणि बिकट होत चाललेला पाण्याचा प्रश्न यामुळे जळगावकर त्रस्त झाले आहेत. या सर्व गंभीर समस्यांवर आता महापालिका प्रशासनासह प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी आपली नैतिक जबाबदारी ओळखून तातडीने पावले उचलण्याची वेळ आली आहे.
प्रदूषणासोबतच खराब रस्ते आणि धुळीचा प्रचंड त्रास दिवाळीतील धुरापाठोपाठ जळगाव शहरातील अनेक भागांत रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. या खराब रस्त्यांमुळे वाहने जाताना उडणाऱ्या धुळीचा नागरिकांना नाहक आणि गंभीर त्रास सहन करावा लागत आहे. श्वसनाचे विकार असणारे नागरिक, लहान मुले आणि वृद्ध यांच्यासाठी ही धूळ अत्यंत घातक ठरत असून, महापालिकेने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने रस्ते दुरुस्ती व धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पाण्याचा बिकट प्रश्न आणि नागरिकांचे दुर्लक्ष एकीकडे शहरात पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट होत चालला असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत आहे, तर दुसरीकडे अजूनही अनेक नागरिक पाण्याचा वापर अत्यंत निष्काळजीपणे करत असल्याचे चित्र आहे. जलसंकटाचे हे काळे ढग डोक्यावर असताना पाण्याची नासाडी थांबवणे आणि पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणे ही काळाची गरज बनली आहे.
नगरसेवकांची नैतिक जबाबदारी आणि पुढाकार शहरातील या विविध समस्यांवर केवळ प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही. जळगावातील प्रत्येक नगरसेवकाने आपली नैतिक जबाबदारी म्हणून यात पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपापल्या प्रभागातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रणासाठी नगरसेवकांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून पाठपुरावा करावा आणि जनतेच्या समस्या सोडवाव्यात, अशी तीव्र मागणी आता जळगावकरांमधून होत आहे.
केवळ निवडणुकांपुरते राजकारण न करता, नागरिकांच्या आरोग्याशी आणि मूलभूत सुविधांशी निगडेड या प्रश्नांवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी आणि महापालिकेने गांभीर्याने विचार करून तातडीने ठोस कारवाई करावी, अन्यथा जळगावकरांचा हा उद्रेक रस्त्यावर उतरेल, असा इशारा पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून दिला जात आहे.







