Advertisement

नगरसेवक अन् सामाजिक कार्यकर्त्यांचा अचानक ‘धाड सत्र’ पाहणी दौरा; मनपा प्रशासनाला दिला ‘हा’ थेट इशारा!

जळगाव: एकीकडे शहरात व्हायरल इन्फेक्शनचा उद्रेक झालेला असताना, दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य केंद्रांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पिंप्राळा घरकुल येथील मनपा आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना औषधे व सलाईन अभावी रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

नगरसेवक सुरेश सोनवणे, जाकीर पठाण, अतुल बारी व सामाजिक कार्यकर्ते किरण भाई यांनी गुरुवारी या आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष स्थितीची पाहणी केली. या पाहणीत आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडालेला पाहायला मिळाला. ज्या रुग्णांना तातडीने सलाईन चढवण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी केंद्रात कसलीही सोय उपलब्ध नाही.

आरोग्य विभागाच्या कारभारावर उठले थेट प्रश्न:

  • साथीचे आजार वाढत असताना औषधांचा पुरवठा का बंद आहे?

  • हजारो लोकसंख्येसाठी पुरेसा वैद्यकीय स्टाफ का तैनात केला नाही?

  • प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईनसारख्या प्राथमिक सोयी का उपलब्ध नाहीत?

मनपा प्रशासनाने या सर्व प्रकाराची तातडीने चौकशी करून घरकुल आरोग्य केंद्रातील त्रुटी २४ तासांत दूर कराव्यात आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा द्याव्यात, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी केली आहे.

“गोरगरीब नागरिकांसाठी असलेल्या आरोग्य केंद्रातच औषधे नसतील तर सामान्य जनतेने जायचे कुठे? रुग्णांच्या जीवाशी चाललेला हा खेळ आता खपवून घेतला जाणार नाही!”

नगरसेवक व पदाधिकारी

व्हायरल इन्फेक्शनची साथ नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने आरोग्य केंद्रात औषधांचा साठा, पुरेसा कर्मचारी वर्ग आणि सलाईनची सोय उपलब्ध करून द्यावी. अन्यथा आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला आहे.

Darpaan Jagat