Advertisement

पिंपळगावकरांचा नाशिकचा फेरा वाचणार! सह्याद्री अतिथीगृहावरील मंत्रिमंडळ बैठकीत ‘या’ ४ महत्त्वाच्या निर्णयांवर मोहर

मुंबई | सह्याद्री अतिथीगृहावरील मंत्रिमंडळ बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय; पिंपळगाव बसवंतला दिवाणी न्यायालय, नागपूर व अहिल्यानगरमध्ये नवीन विद्यापीठे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाला गती देणारे आणि नागरिकांना दिलासा देणारे चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

या बैठकीतील निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे ‘दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर’ स्थापन करण्यास मंजुरी मिळाल्याने स्थानिकांचा नाशिकला जाण्याचा प्रवास वाचणार आहे.

मंत्रिमंडळाचे ४ प्रमुख निर्णय (संक्षिप्त)

  • खेळाडू व मार्गदर्शकांसाठी सुधारित रोख बक्षीस धोरण (क्रीडा विभाग):

    आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडू तसेच त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना (कोच) दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.

  • नागपूर व अहिल्यानगर येथे नवीन खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठे (उच्च व तंत्रशिक्षण विभाग):

    नागपूर येथे ‘लता मंगेशकर विद्यापीठ’ आणि अहिल्यानगर येथे ‘डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ’ या खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली. या विद्यापीठांमध्ये वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर व सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरू होतील.

  • जत नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी जमीन (महसूल व वन विभाग):

    सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेची नवी प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी मौजे जत येथील २ हजार ५८५ चौ. मीटर शासकीय जमीन हस्तांतरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

  • पिंपळगाव बसवंत येथे दिवाणी न्यायालय (विधि व न्याय विभाग):

    नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे ‘दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर’ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून, यासाठी लागणारी नवीन पदे आणि अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.

Darpaan Jagat