जळगाव (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जळगावचे कलाकार शरद भालेराव यांनी साकारलेल्या ‘मी सावली भिमाची’ या एकपात्री नाट्यप्रयोगाने इतिहास रचला आहे. सलग २५ तास नाट्यप्रयोग सादर करत त्यांनी ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ (International Book of World Records) मध्ये आपल्या नावाची सुवर्ण अक्षरांनी नोंद केली आहे. नुकतेच त्यांना या विश्वविक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र, मेडल आणि सन्मानचिन्ह प्राप्त झाले असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सलग २५ तास अन् २२ प्रयोग!
‘आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान’ व ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (शाखा जळगाव)’ यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन मराठा महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये या विक्रमी प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धगधगता आणि प्रेरणादायी इतिहास मांडणारा १ तास २० मिनिटांचा हा प्रयोग शरद भालेराव यांनी २५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सुरू केला, तो थेट २६ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजेपर्यंत सलग सुरू होता. या काळात त्यांनी एकूण २२ प्रयोग सादर करून हा अभूतपूर्व विश्वविक्रम प्रस्थापित केला.
भालेराव यांचा हा दुसरा विश्वविक्रम!
विशेष म्हणजे, जळगाव जनता बँकेत कार्यरत असलेल्या शरद भालेराव यांचा हा दुसरा विश्वविक्रम आहे. यापूर्वी त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तब्बल १७ हजार स्क्वेअर फुटांचे भव्य पोर्ट्रेट साकारून ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव नोंदवले होते. आता ‘मी सावली भिमाची’ या नाटकाद्वारे त्यांनी कलाक्षेत्रात पुन्हा एकदा जळगावचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर वाजवला आहे.
सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन
शरद भालेराव यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जळगावचे आमदार मा. राजुमामा भोळे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
हा विश्वविक्रम साकारण्यासाठी किशोर सूर्यवंशी, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्रा. एल. पी. देशमुख सर, दिग्दर्शक चिंतामण पाटील, प्रबुद्ध भालेराव, विलास यशवंते, हरिश्चंद्र सोनवणे, विठ्ठल भालेराव, कुलदीप भालेराव, वैभव सोनवणे आणि संजय सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.














