जळगाव: शालेय क्रीडा स्पर्धांच्या नव्या पर्वाची सुरुवात मानल्या जाणाऱ्या सुब्रोतो आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला यंदा जळगाव जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनाक ८ ते ११ जुलै पर्यंत गोदावरी इंजीनियरिंग कॉलेज,जळगाव येथे झालेल्या या स्पर्धेत तब्बल ७८ संघ, १४४० खेळाडू आणि ८० सामने खेळविण्यात आले. जिल्ह्याच्या फुटबॉल इतिहासात “न भूतो न भविष्यति” असा हा विक्रमी सहभाग ठरल्याची भावना क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
यावर्षी स्पर्धा महानगरपालिका (मनपा) व उर्वरित जिल्हा अशा दोन विभागांत घेण्यात आल्या. १५ वर्षांखालील मुलांच्या गटात मनपाचे १० तर उर्वरित विभागातील १६ संघ सहभागी झाले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात मनपाचे १६ व उर्वरित विभागातील २७ संघांनी सहभाग नोंदविला. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात मनपाचे ७ व उर्वरित विभागातील ८ संघ मैदानात उतरले.
*अंतिम निकाल*
१५ वर्षांखालील मुले (मनपा)
विजेता : सेंट टेरेसा स्कूल, जळगाव
उपविजेता : गोदावरी इंग्लिश स्कूल, जळगाव
तृतीय : इकरा सालारनगर स्कूल, जळगाव
१५ वर्षांखालील मुले (उर्वरित)
विजेता : सेंट अलॉयसिस स्कूल, भुसावळ
उपविजेता : लॉईड गणेशा, जामनेर
तृतीय : इकरा पब्लिक स्कूल, मोहाडी
१७ वर्षांखालील मुले (मनपा)
विजेता : गोदावरी इंग्लिश स्कूल, जळगाव
उपविजेता : इक्रा शाहीन स्कूल, जळगाव
तृतीय : अँग्लो उर्दू हायस्कूल, जळगाव
१७ वर्षांखालील मुले (उर्वरित)
विजेता : अनुभूती इंटरनॅशनल स्कूल
उपविजेता : सेंट अलॉयसिस स्कूल, भुसावळ
तृतीय : स्वामी विवेकानंद स्कूल, अमळनेर
१७ वर्षांखालील मुली (मनपा)
विजेता : पोदार इंटरनॅशनल स्कूल
उपविजेता : एल. एच. पाटील स्कूल
तृतीय : गोदावरी इंग्लिश स्कूल
१७ वर्षांखालील मुली (उर्वरित)
विजेता : सेंट अलॉयसिस स्कूल, भुसावळ
उपविजेता : रुस्तमजी स्कूल
तृतीय : तापी पब्लिक स्कूल, भुसावळ
जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे मुख्य आश्रयदाते अशोक जैन, अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिव फारुक शेख यांच्या नेतृत्वात संचालक ताहेर शेख, मनोज सुरवाडे, भास्कर पाटील, ॲड. आमिर शेख, इम्तियाज शेख, प्रा. डॉ. अनिता कोल्हे, प्रा. हिमाली बोरोले, क्रीडा शिक्षिका ममता प्रजापत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळे जिल्ह्यात फुटबॉलची चळवळ अधिक बळकट होत आहे.
मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील २५ मुला-मुलींनी राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ तसेच इतर प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून जळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. तसेच जिल्हाभर यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेचा सकारात्मक परिणामही या विक्रमी सहभागातून स्पष्टपणे दिसून आला.
सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी या यशाबद्दल साबीर शेख, प्रा. हिमाली बोरोले, ममता प्रजापत, ॲड. आमिर शेख, प्रा. डॉ. अनिता कोल्हे, वसीम शेख, वसीम रियाज, तौसिफ खान आणि अरबाज खान यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, क्रीडा समन्वयक शिवछत्रपती आव्हाड, किशोर चौधरी यांचे सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांचेही विशेष सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
फारुक शेख यांनी सांगितले की, सुब्रोतो कप स्पर्धेने शालेय क्रीडा हंगामाची अत्यंत उत्साहवर्धक सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये यापेक्षाही अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग मिळेल, असा विश्वास आहे. फुटबॉल हा केवळ खेळ नसून शिस्त, संघभावना, नेतृत्व आणि निरोगी जीवनशैली घडविणारे प्रभावी माध्यम असल्याने प्रत्येक शाळेने आणि पालकांनी विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.












