जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या बहुचर्चित घरकूल घोटाळा प्रकरणाशी संबंधित भूसंपादनाची एक अत्यंत महत्त्वाची फाईल तब्बल अडीच वर्षांपासून गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी थेट महापालिकेच्या रेकॉर्ड रूममध्ये जाऊन पंचनामा केल्याने पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय? जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील घरकूल योजनेशी संबंधित गट क्रमांक ३३७/३ अ/१ आणि ३३७/३ अ/२ या भूसंपादन प्रकरणाची एक नवीन फाईल तयार करण्यात आली होती. ही फाईल महापालिकेच्या अभिलेख (रेकॉर्ड) विभागात सुरक्षित ठेवण्यात आली होती. मात्र, ३१ जानेवारी २०२४ पासून न्यायालयीन कामकाजासाठी या फाईलची वारंवार मागणी करूनही ती रेकॉर्ड रूममध्ये उपलब्ध होत नसल्याचे उघडकीस आले.
संशयाची सुई अधिक गडद: यापूर्वी जेव्हा घरकूल गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सुरू होता, तेव्हा पोलिसांनी महापालिकेतून १४ महत्त्वाच्या फाईल्स जप्त केल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाच्या पुढील कामकाजासाठी एक स्वतंत्र फाईल तयार करण्यात आली होती. आता हीच मुख्य फाईल बेपत्ता झाल्याने, न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी हे कृत्य जाणीवपूर्वक केले गेले आहे का? असा संशय व्यक्त होत आहे.
महापालिका प्रशासनाची पावले आणि पोलीस तक्रार: फाईल गायब असल्याचे समजल्यानंतर नगररचना विभाग आणि अभिलेख विभागाने अनेकदा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने तत्कालीन महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी पोलिसांत रीतसर तक्रार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, नगररचनाकार अमोल पाटील यांनी २ जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून रेकॉर्ड रूमचा पंचनामा: गुन्हा दाखल होताच पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. तपासी अधिकारी जितेंद्र तावडे आणि प्रफुल्ल धांडे यांनी सोमवारी महापालिकेला भेट दिली. दोन पंचांच्या उपस्थितीत त्यांनी थेट रेकॉर्ड रूमची पाहणी करून पंचनामा केला. तसेच नगररचना विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राथमिक माहिती जाणून घेतली.
पुढील तपास: या अत्यंत संवेदनशील प्रकरणात अधिक पुरावे आणि कागदपत्रे गोळा करण्यासाठी पोलिसांकडून महापालिकेला लवकरच अधिकृत पत्र पाठवले जाणार आहे. ही फाईल नेमकी कधी, कशी आणि कोणाच्या ताब्यातून गायब झाली, याचा सखोल तपास जळगाव शहर पोलीस करत आहेत.












