Advertisement

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या थार गाडीला भीषण अपघात; सुदैवाने बालंबाल बचावले

सांगली (कवठेमहांकाळ): महाराष्ट्राचा प्रसिद्ध पैलवान आणि ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता सिकंदर शेख यांच्या गाडीला रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या थार गाडीचा चक्काचूर झाला असून, सुदैवाने सिकंदर शेख या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.
डिव्हायडरला धडक, गाडीचा चक्काचूर
हा अपघात आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसराजवळ घडला. सिकंदर शेख हे आपल्या थार वाहनाने प्रवास करत असताना अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगातील थार रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हायडरवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की गाडीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. 
चाहत्यांची धाकधूक वाढली
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि कुस्तीप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. सिकंदर शेख यांच्या अपघाताची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्याने त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
सिकंदर शेख सुखरूप
या भीषण अपघातात गाडीचे प्रचंड नुकसान झाले असले तरी, सुदैवाने पैलवान सिकंदर शेख यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. ते पूर्णपणे सुखरूप असून त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
Darpaan Jagat