जळगाव: धुळे-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या धक्कादायक घटनेची केंद्रीय स्तरावर अत्यंत गंभीर दखल घेण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले असून, चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित ठेकेदारांना थेट काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्यासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे.
आसोदा उड्डाणपूल खचल्याची घटना समोर आल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर लगेचच नवी दिल्ली गाठून त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची ठाम मागणी केली होती.
या घटनेनंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, जळगावच्या महापौर दीपमाला काळे आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता.
जळगाव शहरासाठी नवीन उड्डाणपूल व अंडरपासला मंजुरीचा मार्ग सुकर
या भेटीदरम्यान खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव शहरातील तीव्र वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांचा प्रश्नही गडकरींसमोर मांडला. शहरांमधील आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौक तसेच नशिराबाद येथील महालक्ष्मी मंदिर मार्गावर उड्डाणपूल किंवा व्हेईक्युलर अंडरपास (VUP) उभारण्याची मागणी त्यांनी केली.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे भविष्यात जळगाव शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास, अपघातांचे प्रमाण घटण्यास आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुकर होण्यास मोठी मदत होणार आहे.














