Advertisement

स्नेहदर्पण सेवा फाउंडेशनच्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत राहुल राणे प्रथम; ७९ कवितांमधून झाली विजेत्यांची निवड

जळगाव:येथील स्नेहदर्पण सेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “आई – मातृत्वाचा शब्दांत गौरव” या राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यलेखन स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांच्या प्रचार व प्रसारासाठी घेतलेल्या या स्पर्धेत पुण्याच्या राहुल राणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मराठी भाषेचा वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वयाची कोणतीही अट नसलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून एकूण ७९ स्वलिखित मराठी कविता प्राप्त झाल्या होत्या. स्पर्धेचे अचूक व निष्पक्ष परीक्षण भास्कर जुनागडे आणि प्रदीप भोई यांनी केले. यामधून जामनेरच्या अश्विनी चौधरी यांनी द्वितीय, तर बुलढाण्याचे दुर्गेश एन. पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
स्पर्धेतील सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम ‘बाय पोस्ट’ द्वारे त्यांच्या घरच्या पत्त्यावर पाठवण्यात येणार आहे. तसेच, स्पर्धेत सहभाग घेतलेल्या इतर सर्व ७९ कवींना त्यांची आकर्षक सहभाग प्रमाणपत्रे पाठवण्यात आली आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पवन खंबायत, अमोल चव्हाण, कल्पेश व्हिरोडकर, भूपेंद्र ठाकरे, स्नेहा चौरे आणि अनिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Darpaan Jagat