मुंबई: अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना अचानक तीव्र वेग आला आहे. दिल्लीहून परतल्यानंतर मुंबईत तातडीने राजकीय हालचाली सुरू झाल्या असून, पक्षांतर्गत घडामोडींमुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अमित शहांच्या भेटीत ‘आई-लेक’ अनुपस्थित
पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि समीर भुजबळ यांचा समावेश होता. मात्र, या महत्त्वाच्या भेटीदरम्यान पक्षाध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. या भेटीमुळे पक्षात सर्व काही आटोक्यात आहे का, याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
‘देवगिरी’वर कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
दिल्लीहून परतल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरुवातीला मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी अनौपचारिक चर्चा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील आगामी वाटचाल, पक्ष संघटनेसमोरील आव्हाने आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
अनिल पाटील यांच्या मुंबईवारीची चर्चा
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्याचे नेते तथा माजी मंत्री अनिल पाटील यांना तातडीने मुंबईत बोलावण्यात आले. मुंबईला रवाना होण्यापूर्वी बोलताना अनिल पाटील यांनी, आपण जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात नेत्यांची भेट घेण्यासाठी जात असल्याचे स्पष्ट केले. तसेच, मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांना अचानक आलेल्या या बोलावण्यामुळे मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
पुढील रणनीतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील या ताज्या घडामोडी, मंत्रिपदांची रिक्त पदे, आणि आगामी राजकीय रणनीतीबाबत पक्षश्रेष्ठी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. आगामी काळात होणाऱ्या निर्णयांवरून महायुती आणि राष्ट्रवादीमधील अंतर्गत समीकरणांचे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.