जळगाव : जळगाव जिल्हा एकता संघटनेने यावर्षी जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि या शाळांच्या विकासासाठी समाजात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने संघटनेच्या वतीने शहरापासून ग्रामीण भागापर्यंत विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शिक्षक, विद्यार्थी, पालक व शालेय समिती सदस्यांशी संवाद साधला जात आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून यावल तालुक्यातील दहीगाव येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेला जळगाव जिल्हा एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख व त्यांचे सहकारी हाफिज रहीम पटेल, दानिअल शेख, मौलाना गुफरान व नजमोद्दीन शेख यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची तसेच शाळेतील उपलब्ध सुविधांची माहिती घेण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता व प्रतिभेची कमतरता नाही. त्यांना योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, असे फारुक शेख यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा व इतर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करत शाळेसाठी आवश्यक क्रीडा साहित्य तसेच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या इतर सुविधांसाठी सहकार्य करण्याची घोषणा फारुक शेख यांनी केली. या घोषणेचे शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी स्वागत केले.
*शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सरकारी शाळांवर लक्ष*
जळगाव जिल्हा एकता संघटनेच्या या उपक्रमांतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या शाळांसह जिल्हा परिषद शाळांनाही भेटी देण्यात येत आहेत. पाळधी, नशिराबाद, शिरसोली, पहूर, पारधी यांसह विविध ठिकाणच्या शाळांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या गरजा आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे.
सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजातील प्रत्येक घटकाने प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. सरकारी शाळा केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजाच्या सहभागातून या शाळांचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणता येऊ शकतो, अशी भूमिका जिल्हा एकता संघटनेने घेतली आहे.
शाळांची गरज ओळखून क्रीडा साहित्य, शैक्षणिक साधने आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले.
*दहीगाव येथे शिक्षक, शालेय समिती व ग्रामस्थांची उपस्थिती*
दहीगाव येथील कार्यक्रमाला जळगाव जिल्हा एकता संघटनेचे हाफिज रहीम पटेल, नजमुद्दीन शेख, दानियल शेख व मौलाना शेख तर साकळी चे शिक्षक तज्ञ असलम सर,यावल बिरादरीचे हाफिज शेख यांची उपस्थिती होती.
तसेच दहीगाव जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख कुतुबुद्दीन गयासुद्दीन, उपशिक्षक शेख सुलेमान शेख लुकमान, पदवीधर शिक्षक माजिद खान यासीन खान आणि पदवीधर शिक्षिका नगमा बानो शेख सत्तार उपस्थित होत्या.
शालेय समिती सदस्य म्हणून जाफर खान निसार खान, हारून सुभान पटेल, तसलीम खान रसूल खान, अजमल खान, इकबाल पिंजारी, शकील पटेल यांची उपस्थिती होती.
याशिवाय गावातील जबाबदार नागरिकांमध्ये हाजी मुक्तार मेंबर साहेब, शेख वजीर शेख सुपडू, सत्तार मेंबर, बिरहाम पठाण, अखिल भाईसाहेब, शेख इकबाल भाईसाहेब, इम्रान भाई, मोबाईल वाले मोसिन मेंबर साहेब तसेच इतर शालेय समिती सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सरकारी शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या समाजाच्या भविष्यातील आधारस्तंभ आहे. त्याला संधी, सुविधा आणि प्रोत्साहन देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” या विचारातून जळगाव जिल्हा एकता संघटनेचा हा सकारात्मक उपक्रम पुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे फारुक शेख यांनी सांगितले.













